ऐकावे ते नवलच! WeChat वर नाकात बोटे घालणे, ओठावरून जीभ फिरवणे, डोक्यावर अंडरवेअर घालण्यास बंदी; Tencent ने जारी केले नियम
Representative Image (Photo Credit: Twitter/WeChat)

जगात जवळजवळ 1 अब्जाहून अधिक लोक विचॅट (WeChat) अ‍ॅप वापरत आहेत. हे चीनमधील (China) सर्वात लोकप्रिय सोशल मेसेजिंग अ‍ॅपदेखील मानले जाते. अलीकडच्या काळात चीनमध्ये या अ‍ॅपवर अश्लीलता व हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप झाला आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने हे अ‍ॅप बनवणाऱ्या टेंन्सेंट होल्डिंग लिमिटेड (Tencent) या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता कंपनीने आपल्या अ‍ॅपची प्रतिमा सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. याबाबतचे पहिले पाऊल म्हणजे कंपनीने अ‍ॅपवर अनेक गोष्टींसाठी प्रतिबंध घातला आहे. याबाबतची यादी त्यांनी नुकतीच प्रकाशित केली.

हे अ‍ॅप चीनमधील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अगदी पेमेंट करण्यापासून ते विमानाची तिकिटे बुक करण्यापर्यंत हे अ‍ॅप जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी वापरले जात आहे. मागील वर्षी, टेंन्सेंटने ‘चॅनेल’ नावाचे थेट प्रसारण फिचर (Live Broadcasting Feature) सुरू केले. आता प्लॅटफॉर्म साफ करण्याच्या प्रयत्नात, चिनी तंत्रज्ञान दिग्गज कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चॅनल्स मॉनिटरिंग करताना आढळलेल्या 'उल्लंघनांची' ची यादी प्रकाशित केली आहे.

त्यानुसार नाकात बोटे घालणे, ओठावरून जीभ फिरवणे, डोक्यावर अंडरवेअर घालणे अशा गोष्टी व्हिडीओमध्ये आढळल्यास त्याला उल्लंघन समजले जाणार आहे. इथे तथाकथित ‘अश्लील’ कंटेंट प्रतिबंधित आहे. यात लैंगिक उत्तेजना निर्माण करणाऱ्या कृतींचा समावेश आहे. तसेच कॅमेरावर शरीराचा ‘संवेदनशील’ भाग दाखवणे आणि स्पॅन्किंग देखील प्रतिबंधित आहे. टेंन्सेन्टने कपड्यांच्या बाबतीतही अनेक नियम लागू केले आहे. त्यानुसार इथे फिशनेट स्टॉकिंग्ज घालण्यास मनाई आहे. टेंन्सेन्टच्या म्हणण्यानुसार महिलांना बिकिनीमध्ये, फक्त बेडशीट किंवा आंघोळीच्या टॉवेल्समध्ये स्वतःला लपेटून प्रसारण करण्याची परवानगी नाही.

टॅटू दर्शवणे हे देखील विचॅटच्या नियमांचे उल्लंघन समजले जाईल. इतर उल्लंघनांमध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील कंटेंटबद्दल बोलणे, अल्पवयीन मुलांना लाईव्ह स्ट्रीमिं होस्ट करण्याची परवानगी देणे आणि जुगार संबंधित कंटेंटचा प्रचार करणे अशा गोष्टी समाविष्ट आहेत. अशा प्रकारे कोरोना व्हायरस महामारीच्या काळात अधिकारी लाइव्हस्ट्रीमिंगवर प्रसारित होणाऱ्या कंटेंटवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.