Google Pay द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी भारतीय युजर्संना कोणतेही शुल्क नाही; Google India ची माहिती
Google Pay (Photo Credits: Twitter)

गुगल पे (Google Pay) ने अलिकडेच केलेल्या घोषणेनुसार, गुगल पे चे वेब अॅप (Web App) बंद होणार असून त्वरीत पैसे पाठवण्यासाठी (Instant Money Transfer) काही शुल्क आकारले जाणार आहेत. परंतु, बुधवारी गुगल इंडियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या स्पष्टीकरणानुसार पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क हे फक्त अमेरिकन युजर्ससाठी असून भारतीय युजर्संना ही सुविधा मोफत मिळणार आहे. जानेवारी 2021 पासून वेब अॅप बंद होणार असल्याची घोषणा  गुगल ने वेब अॅपवर एक नोटीस जाहीर करत केली होती.

गुगल इंडियाने आयएएनएस ला दिलेल्या माहितीनुसार, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आकारले जाणारे शु्ल्क हे फक्त अमेरिकन युजर्ससाठी असून भारतात वापरल्या जाणाऱ्या गुगल पे किंवा गुगल पे फॉर बिजनेस युजर्संना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागू होणार नाही. 2021 च्या सुरुवातीपासून गुगल पे चे वेब अॅप वापरुन तुम्ही कोणालाही पैसे पाठवू किंवा स्वीकारु शकणार नाही. पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला गुगल पे अॅपचा वापर करावा लागेल, अशी माहिती कंपनीने युएस मधील युजर्संना दिली आहे.

गुगल पे चे वेब अॅप जानेवारीपासून अमेरिकन युजर्ससाठी बंद होईल आणि त्वरीत पैसे पाठवण्यासाठी शुल्क आकारण्यात येईल, अशी माहिती गुगल ने आपल्या वेबसाईटच्या एका सपोर्ट पेजवर माहिती दिली होती. (Google Pay च्या वेब अॅपवर जानेवारी 2021 पासून पेमेंट बंद; त्वरीत पैसे पाठवण्यासाठी आकारले जाऊ शकते शुल्क)

तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 1-3 दिवसांचा कालावधी लागू शकतो. डेबिट कार्डने त्वरीत पैसे ट्रान्सफर करता येतील. परंतु, ट्रान्सफर केलेल्या रक्कमेच्या दीड टक्के रक्कम किंवा 23 रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती शुल्क म्हणून आकारण्यात येईल, अशी माहिती गुगलने आपल्या सपोर्ट पेजवर दिली आहे.