रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जगातील सर्वात मोठ्या नवीन ऑनलाइन-टू-ऑफलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्याच्या मार्गावर आहेत. रिलायन्स जिओ सध्या ‘सुपर अॅप’ वर काम करत आहे, ज्याद्वारे युजर्स एकाच ठिकाणी तब्बल 100 पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत. यामुळे वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना फार मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, ‘सुपर अॅप’द्वारे रिलायन्स भारतामध्ये नवे WeChat निर्माण करत आहे, ज्यामध्ये स्नॅपडील, पेटीएम, फ्रीचार्ज, फ्लिपकार्ट आणि हाइकसारख्या इतर अनेक कंपन्या अयशस्वी ठरल्या आहेत.
जिओमुळे रिलायन्सचे बाजारपेठेतील स्थान भक्कम झाले, तसेच इतर अनेक कंपन्यांसोबत स्पर्धाही निर्माण झाली. त्यामुळे यात टिकाव धरण्यासाठी रिलायन्स अनेक नव्या गोष्टी घेऊन येत आहे. आता या ‘सुपर अॅप’द्वारे रिलायन्स जिओ ई-कॉमर्स, ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट्स अशा अनेक सुविधा एकाच ठिकाणी प्रदान करणार आहे. मात्र, हे अॅप नेमकं कधीपर्यंत लाँच केलं जाणार आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (हेही वाचा: Reliance Jio GigaFiber ची स्पेशल ऑफर; केवळ 600 रुपयांत मिळेल ब्रॉडब्रँड)
सध्या जिओकडे कन्व्हर्सेशनल आर्टिफिशिअल इंटेलीजंस (AI) लेयर, एक व्हर्नाकुलर व्हॉइस टेक लेयर, एक लॉजिस्टिक्स लेयरसह AI आधारित एजुकेशन लेयर आहे. या सर्व लेयर्स आणि जिओ डीव्हाईस नेटवर्क यांच्या साथीने जिओचे WeChat काम करेल. दरम्यान टेलिकॉम क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता मुकेश अंबानी रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. मुंबईजवळ एक मेगासिटी वसवण्याचे रिलायन्सचे नियोजन आहे. सिंगापूरच्या धर्तीवर संपूर्ण शहर उभा करण्याचा रिलायन्सचा मानस आहे.