सध्या अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका 2020 (US Presidential Elections 2020) ची धामधूम आहे. अवघ्या दोन दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इंस्टाग्रामने (Instagram) आपल्या हॅशटॅग पेजेसमधून (Hashtag Pages) रिसेंट टॅब (Recent Tab) तात्पुरता हटवला आहे. निवडणुकीच्या काळात आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर, मेसेजेस यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Facebook सीओओचा इशारा ' Donald Trump यांच्या पोस्ट भडकावू असतील तर हटवल्या जातील')
एरव्ही इंस्टाग्रामवर हॅशटॅग सर्च केल्यावर टॉप पोस्ट (Top Posts) किंवा मोस्ट रिसेंट पोस्ट (Most Recent Posts) यामधून तुम्ही निवड करु शकत होतात. मात्र इंस्टाग्रामने रिसेंट टॅब हटवल्यामुळे आता केवळ टॉप पोस्ट दिसणार आहेत. याची माहिती इंस्टाग्रामने ट्विट करत दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये कंपनीने लिहिले की, आजपासून अमेरिकेतील लोकांसाठी तात्पुरतं रिसेंट टॅब हॅशटॅग पेजवरुन हटवण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट यांना आळा घालण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया माध्यमांवर निवडणुक किंवा राजकारण यांसदर्भात आक्षेपार्ह मजकूर फिरु नये यासाठी लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अॅप यांनी काही महत्त्वपूर्ण पाऊलं उचलली आहेत.
व्होटर पॉलिसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरुन आतापर्यंत 120,000 पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. मात्र निवडणुका जवळ आल्याने चुकीची, दिशाभूल करणारी माहिती इंस्टाग्रामवर शेअर होऊ नये, या दृष्टीकोनातून नवे बदल करण्यात आले आहेत, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, चुकीच्या पद्धतीने विजयाचा दावा करणार्या जाहिरातींवर बंदी घालण्यात येईल. तसंच इतरही खबरदारी घेण्यात येईल, असे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात फेसबुकची परीक्षाच असेल. त्याचबरोबर नोव्हेंबर 3 नंतरही निवडणुकी दरम्यान आक्षेपार्ह मजकूर रोखणे हे कंपनीसमोरील आव्हान असेल, असे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले.
तसंच जाहिरातींमधील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी देखील कंपनी प्रयत्न करत आहे. राजकीय किंवा सामाजिक समस्येची जाहिरात देणाऱ्या व्यक्तीला आमच्या अधिकृतता प्रक्रियेमधून जावे लागेल. मार्च ते सप्टेंबर दरम्यान अधिकृतता न घेता अमेरिकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम्ही 2.2 मिलियन वेळा जाहिराती नाकारल्या आहेत, " असेही त्यांनी सांगितले.