Infosys Delays Hiring Freshers: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने (Infosys) 2022 मध्ये सुमारे 2000 फ्रेशर्सना नोकरीचे ऑफर लेटर सुपूर्द केले होते, परंतु कंपनीने त्यांना आतापर्यंत नोकऱ्या देऊ केल्या नाहीत. बाधित फ्रेशर्सनी मनीकंट्रोलला ही माहिती दिली. फ्रेशर्सना ऑफर करण्यात आलेल्या नोकऱ्या सिस्टीम इंजिनीअर आणि डिजिटल स्पेशलिस्ट इंजिनीअर पदांसाठी आहेत. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, या सॉफ्टवेअर अभियंत्यांना दोन प्री-ट्रेनिंग सेशन्स घेण्यास सांगितले होते, त्यातील शेवटचे 19 ऑगस्ट रोजी होणार होते. मात्र, 19 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पूर्व-प्रशिक्षण सत्रांसाठी ऑनलाइन पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी, अनेक उमेदवारांना अद्याप ओळखपत्रे मिळालेली नसल्याचाही आरोप केला जात आहे.
फ्रेशर्ससाठी पहिले प्री-ट्रेनिंग सत्र चार आठवड्यांपेक्षा जास्त चालले होते, दुसरे सुमारे सहा आठवड्यांचे होते, जे अद्याप सुरू झालेले नाही. 22 एप्रिल 2022 रोजी ऑफर पत्रे जारी करण्यात आली होती, तरीही भरतीला जवळपास दोन वर्षे उशीर झाला आहे. प्रदीर्घ विलंबानंतर, पदवीधरांना 1 जुलै ते 24 जुलै 2024 या कालावधीत विनापेड प्री-ट्रेनिंग प्रोग्रामला उपस्थित राहण्यास सांगितले गेले, आणि एचआर टीमकडून आश्वासन देण्यात आले की, त्यांना 19 ऑगस्ट किंवा 2 सप्टेंबर रोजी नोकऱ्या मिळतील. प्री-ट्रेनिंग पूर्ण करूनही कंपनीने आश्वासन पूर्ण केलेले नाही. नोकरीची तारीख न सांगता, या पदवीधरांना पुन्हा एकदा ऑफलाइन प्री-ट्रेनिंग परीक्षेला बसण्यास सांगण्यात आले आहे.
प्रभावित उमेदवारांनी सांगितले की सिस्टीम अभियंता पदासाठी वार्षिक वेतन 3.6 लाख रुपये होते, तर डिजिटल विशेषज्ञ अभियंता पदासाठी वार्षिक 6.5 लाख रुपये वेतन देऊ केले. जुलैमध्ये, बेंगळुरूस्थित इन्फोसिसने सांगितले होते की यापूर्वी केलेल्या नियुक्त्यांपैकी काही भाग प्रलंबित आहेत.
ही बाब समोर आल्यानंतर पुणेस्थित आयटी कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट (NITES) ने कामगार आणि रोजगार मंत्रालयाला 2022-23 च्या भरतीदरम्यान, सिस्टम इंजिनीअर आणि डिजिटल स्पेशालिस्ट इंजिनीअरच्या भूमिकेसाठी निवडलेल्या 2000 अभियांत्रिकी पदवीधरांचे सुरू असलेले ‘शोषण’ थांबवण्याची विनंती केली आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातक कंपनी असलेल्या इन्फोसिसने 2022 साठी फ्रेशर्सना ऑफर लेटर पाठवले होते, परंतु आयटी उद्योगातील मंदीनंतर, उमेदवारांना फक्त जॉईन करून घेण्यात आले, त्याना कामावर घेतले नाही.
इन्फोसिसचे सीइओ आणि एमडी सलील पारेख यांनी 3 जून रोजी जारी केलेल्या कंपनीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, 2022-23 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून 50,000 पेक्षा जास्त फ्रेशर्सची नियुक्ती करण्यात आली होती, जी आर्थिक वर्षे 2023-24 मध्ये सुमारे 11,900 पर्यंत घटली. या कालावधीत, कंपनीने दोन दशकांत प्रथमच संपूर्ण वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट नोंदवली. (हेही वाचा: Cognizant: कॉग्निझंटने कमी पगारावर झालेल्या टीकेवर दिले स्पष्टीकरण, अभियांत्रिकी पदवीधरांना 4 ते 12 लाख वेतनाची करतात ऑफर)
एका उमेदवाराने सांगितले, कंपनीवर विश्वास ठेवून त्याने प्रशिक्षणपूर्व परीक्षा दिली. मात्र अजूनही तो निकालाची अपेक्षा करत आहेत. कंपनी त्याला फक्त वारंवार पूर्व-प्रशिक्षण ईमेल पाठवत आहे. दुसऱ्या एका उमेदवाराने सांगितले की, त्याला 1 जुलै रोजी मेल आला, ज्यामध्ये त्याची पूर्व-प्रशिक्षण तारीख नमूद होती. परीक्षेनंतर निकाल दोन दिवसांत घोषित केले जातील आणि 2 सप्टेंबरपर्यंत कंपनीमध्ये सामील केले जाईल, असेही सांगण्यात आले. त्यानंतर त्याने इतर अनेकांसह 24 जुलै रोजी पूर्व प्रशिक्षण परीक्षा दिली. मात्र त्यानंतर त्याला आणखी एक पूर्व-प्रशिक्षण ईमेल प्राप्त झाला. नंतर अनेक उमेदवारांनी इन्फोसिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. आता याबाबत इन्फोसिसवर त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी उमेदवार करत आहेत.