प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Money Control.com)

प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी नव-नवीन योजना सुरू करत असते. 'इंडियन बँक'ने (Indian Bank) आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 मार्चपासून इंडियन बँकेच्या एटीएममधून (ATM) 2 हजाराच्या नोटा निघणार नाहीत. त्याऐवजी बँकेकडून 200 रुपये मूल्याच्या नोटांचा पुरवठा वाढवण्यात येणार आहे.

इंडियन बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधून दोन हजाराच्या नोटा मिळाल्यानंतर ग्राहकांना सुट्टे पैसे मिळण्यास अडचण येते. त्यामुळे 1 मार्चपासून इंडियन बँकेच्या एटीएममधून ग्राहकांच्या सोयीसाठी 200 रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात भरण्यात येणार आहेत. ग्राहकांना एटीएममधून दोन हजाराच्या नोटा मिळत असल्याने त्यांना याची मोड करण्यासाठी जवळच्या बँकेत जावे लागतं. परिणामी ग्राहकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे ग्राहकांचा हा सर्व त्रास वाचवण्यासाठी इंडियन बँकेने आपल्या एटीएममध्ये 200 रुपयांच्या नोटा भरण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात सध्या इंडियन बँकेचे 3,988 एटीएम आहेत. येत्या 1 मार्चपासून या एटीएममध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा भरण्यात येणार आहेत. (हेही वाचा - भारतामधील नेटफ्लिक्स युजर्सना झटका; बंद झाले पहिल्या महिन्यातील Free Subscription)

इंडियन बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिसाला मिळणार आहे.  दरम्यान, केंद्र सरकार लवकरचं सार्वजनिक क्षेत्रातील दहा सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची अंमलबजावणी करणार आहे. या विलीनीकरणानंतर देशात चार मोठ्या बँकांची निर्मिती होणार आहे. 1 एप्रिल 2020 पासून या नव्या बँका अस्तित्त्वात येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.