नेटफ्लिक्स इंडियाने (Netflix India) आपल्या भारतीय ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आत्तापर्यंत पहिल्या महिन्यात आपण नेटफ्लिक्स विनामूल्य वापरत होता, नेटफ्लिक्सची ही खूप चांगली सोय होती, परंतु आता तसे होणार नाही. नेटफ्लिक्सने ही सुविधा बंद केली आहे, आता पहिल्या महिन्यासाठीही तुम्हाला पैसे द्यावे लागतील. नेटफ्लिक्सने आपल्या अॅपवर या गोष्टीची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
नेटफ्लिक्सची ही ऑफर केवळ नवीन सदस्यांसाठी आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रथमच नेटफ्लिक्स वापरणार असाल, तर तुम्हाला पहिल्या महिन्याच्या वर्गणीसाठी (Subscription) फक्त 5 रुपये भरावे लागतील.
पहिल्या महिन्याचे सबस्क्रिप्शन संपल्यावर तुम्ही 199 ते 799 पर्यंत हवा तो प्लान घेऊ शकता. याआधी नेटफ्लिक्सची पहिल्या महिन्याची सदस्यता विनामूल्य उपलब्ध होती. गॅझेट्स 360 च्या अहवालानुसार, नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने या ऑफरची पुष्टी केली आहे. ही एक प्रमोशनल ऑफर आहे जी एका महिन्यासाठी 5 रु. च्या किंमतीवर उपलब्ध असेल. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सने मोबाइल ग्राहकांसाठी मासिक योजना आणली, ज्याची किंमत 199 रुपये आहे. (हेही वाचा: NetFlix ने भारतात लाँच केला 199 रुपयांचा 'Mobile Only' प्लान)
या किंमतीला, ग्राहकांना एसडी गुणवत्ता मिळेल आणि ती एकाच स्क्रीनवर वापरली जाऊ शकते. म्हणजेच 199 च्या नेटफ्लिक्स प्लानचा उपयोग एकाच फोनवर केला जाऊ शकतो. कंपनीने या योजनेला गो-मोबाइल असे नाव दिले आहे. ही मोबाइल योजना स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर वापरली जाऊ शकते. दरम्यान, एकीकडे पहिल्या महिन्यातील फ्री नेटफ्लिक्सची सुविधा बंद झाल्याचे दुःख आहे, तर दुसऱ्या बाजूला नेटफ्लिक्सने ही सुविधा केवळ 5 रु. मध्ये सुरु केल्याचा दिलासाही आहे.