प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या अनेक टेक कंपन्यांनी (Tech Companies) कर्मचार्‍यांच्या नवीन भरतीला ब्रेक लावला आहे. यासह कंपन्या आपल्या काही कर्मचाऱ्यांना कामावरूनही काढून टाकत आहेत. अशात आयटीमध्ये काम करण्याचा मानस असलेल्या युवकांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. काही भारतीय टेक कंपन्या नवीन भरती करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक, टेक महिंद्रा (Tech Mahindra) पुढील 1 वर्षात (12 महिन्यांत) 20 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या योजनेवर काम करत आहे.

बिझनेस टुडेशी बोलताना टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीपी गुरनानी यांनी या भरतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. गुरनानी म्हणाले, ‘आम्ही पुढील एका वर्षात सुमारे 20,000 लोकांना आमच्याशी जोडू. आज आमच्यासोबत 1,64,000 लोक काम करत आहेत व आतापासून बारा महिन्यांत आम्ही 1,84,000 लोकांची संख्या गाठू.’

काल, मंगळवारी जाहीर झालेल्या तिमाही निकालांनुसार, आयटी सेवा सल्लागार कंपनीने कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 5,877 लोकांना कामावर घेतले, जे जूनच्या तिमाहीत 6,862 होते. कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1,63,912 आहे. कंपनीचा नोकरी गमावण्याचा दर देखील मागील तिमाहीत 22 टक्क्यांवरून Q2FY23 मध्ये 20 टक्क्यांवर घसरला आहे. वर्ष-दर-वर्ष अट्रिशनमध्येही घट झाली आहे. (हेही वाचा: Layoffs at Twitter: पराग अग्रवाल यांच्यानंतर Elon Musk 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत)

अर्निंग कॉल दरम्यान गुरनानी म्हणाले, ‘164,000 कर्मचारी ही मोठी संख्या आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही भविष्य घडवण्यासाठी कर्मचार्‍यांचे चांगले व्यवस्थापन केले पाहिजे. आम्ही भविष्य, कौशल्य विकास आणि जागतिक वितरण मॉडेलवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही आमची (कामगार) रणनीती तयार करणार आहोत.’ या कॉल दरम्यान, आयटी सेवा कंपनीने सांगितले की, त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 10,000 फ्रेशर्स जोडले आहेत आणि चालू आर्थिक वर्षातही अशीच संख्या जोडण्याची त्यांची योजना आहे.