एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter) जबाबदारी स्वीकारल्यापासून हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. यामध्ये बहुतांश प्रकरणे अशी आहेत की ज्यामुळे फक्त मस्कच नाही तर ट्विटरच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे. मस्क सतत कंपनीच्या खराब आर्थिक स्थितीचे कारण देत आहेत. खर्च कमी करण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या छाटणीपासून त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत मर्यादा आणल्या आहेत. असे असतानाही कंपनीची अवस्था इतकी बिकट आहे की, ती आपल्या कार्यालयाचे भाडेही भरू शकत नाही.
हे प्रकरण ट्विटरच्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयाशी संबंधित आहे. येथे भाडे न दिल्याने ट्विटर कंपनीविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. 13 डिसेंबरच्या अहवालानुसार, ट्विटर जगभरातील आपल्या कार्यालयांचे आणि मुख्यालयांचे भाडे भरण्यास असमर्थ ठरत आहे. आता असे समोर आले आहे की ट्विटरवर त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को कार्यालयाचे भाडे न भरल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला आहे. ट्विटरने त्याच्या सॅन फ्रान्सिस्को कार्यालयासाठी $136,250 भाडे दिलेले नाही.
हे ऑफिस भाड्याने देणारी कंपनी कोलंबिया रीटचे म्हणणे आहे की, त्यांनी ट्विटरला 16 डिसेंबर रोजी इशारा दिला की हार्टफोर्ड इमारतीच्या 30व्या मजल्यावरील भाडेपट्टी पाच दिवसांत संपत आहे. आता त्याचे भाडे न दिल्याने त्यांनी ट्विटरवर गुन्हा दाखल केला आहे. कोलंबिया राइट यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भाडेकरू पाच दिवसांच्या नोटीसचे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे, त्यामुळे गुरुवारी सॅन फ्रान्सिस्को येथील राज्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. (हेही वाचा: ट्विटर कर्मचार्यांना घरून आणावा लागत आहे टॉयलेट पेपर; पैसे वाचवण्यासाठी Elon Musk यांचा नवा फंडा)
न्यूयॉर्क टाइम्सने अहवाल दिला की, ट्विटरने अलीकडच्या आठवड्यात त्याच्या मुख्यालयाचे किंवा इतर कोणत्याही जागतिक कार्यालयाचे भाडे दिलेले नाही. दोन चार्टर फ्लाइटसाठी पैसे देण्यास नकार दिल्याबद्दलही या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीवर दावाही करण्यात आला होता. या प्रकरणावर टिप्पणी करण्याच्या विनंतीला ट्विटरने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, अजूनही ट्विटरचा मीडिया विभाग नाही.