Covid Vaccine Google Doodle: 'माझ्या जवळपासचे COVID लसीकरण केंद्र' बाबत एका क्लिकवर माहिती देणारं आजच खास गूगल डुडल
Google Doodle: Photo Credits: Google Homepage

भारतामध्ये आता कोरोना वायरसची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना लसीकरण वेगवान केले जात आहे. भारतामध्ये 21 जून पासून केंद्र सरकारने सार्‍यांसाठी मोफत लस उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे काल देशात एका दिवसातील सर्वाधिक कोविड 19 लस दिल्याची नोंद झाली आहे. आणि त्यानंतर आज गूगल कडून खास अ‍ॅनिमेटेड डूडलच्या माध्यमातून समाजात लसीकरणाबाबत (Covid Vaccine) जनजागृती साठी खास डूडल बनवण्यात आले आहे. GOOGLE च्या प्रत्येक लेटर ने मास्क घातला असून Covid-19 Aappropriate Behavior चा मेसेज त्यामधून देण्याचा प्रयत्न केला आहे.  दरम्यान आता युजर्सना 'माझ्या जवळपासचे COVID लसीकरण केंद्र' याची माहिती अवघ्या एका क्लिक वर या डूडलद्वारा मिळणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राबाबत होणारा गोंधळ कमी होणार आहे. नक्की वाचा: COVID-19 Vaccination In India Revised Guidelines: भारत सरकार कडून 21 जून पासून सुरू होणार राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम; नवी नियमावली जारी.

दरम्यान भारतामध्ये कोविड 19 लसीकरणामध्ये सध्या 3 प्रमुख लसी उपलब्ध आहेत. कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक वी या तिन्ही लसी दोन डोस मध्ये नागरिकांना दिल्या जात आहेत. सरकारी हॉस्पिटल आणि लसीकरण केंद्रांवर लस मोफत उपलब्ध आहे तर खाजगी रूग्णालयात सशुल्क लस दिली जात आहे. महाराष्ट्रातही मागील काही महिन्यांपासून बंद असलेलं तरूणाई मधील लसीकरण आता लसींचा साठा वाढवल्यानंतर सुरू करण्यात आले आहे.

सरकारी माहितीनुसार, 21 जूनला भारतामध्ये 86.16 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. हे जगातील सर्वाधिक एका दिवसात देण्यात आलेल्या डोसचा आकडा आहे. 16 जानेवारी 2021 पासून आतापर्यंत अंदाजे 28.36 कोटी डोस देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आहे. देशात ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आता काही ठिकाणी ड्राईव्ह ईन सेवा सुरू केली आहे. यामध्ये गाडीतच बसून नागरिकांना लस दिली जाणार आहे. सध्या कोविन अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन करून लसीकरण केंद्रांवर पोहचण्याच्या अटीमध्ये ही शिथिलता दिली आहे त्यामुळे वॉक ईन देखील लसीकरण केंद्रावर तुम्ही पोहचू शकता.