Covid Vaccine Google Doodle: कोव्हिडची लस टोचून घ्या आणि सुरक्षित व्हा हा संदेश देण्यासाठी गूगलचं खास डूडल
Google Doodle| Photo Credits: Google Homepage

भारतामध्ये आज तिसर्‍या टप्प्यातील आणि मोठ्या वयोगटासाठी लसीकरण सुरू होत आहे. भारत सरकारने दिलेल्या नियमावली आजपासून भारतात 18 वर्षांवरील सारेच लस टोचून घेऊ शकणार आहेत. या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि जीव वाचवा अशी साद आता गूगल (Google) कडून देखील घालण्यात आली आहे. आज गूगलच्या होम पेज वर गुगल डूडलच्या (Google Doodle)  माध्यमातून कोव्हिडची लस (Covid Vaccine) घ्या असं आवाहन करण्यात आले आहे. लसी सोबतच मास्क घालणं देखील गरजेचे आहे ही गरज ओळखून गूगलने डूडलमध्ये प्रत्येक अक्षरावर मास्क घातला आहे. या अ‍ॅनिमेटेड गूगल डूडल वर सारे जण लसीकरणानंतरचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

भारतात 45 वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र सरकार तर 18-44 वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाचा कार्यक्रम राज्य सरकार कडून केला जाणार आहे. आज 1 मे पासून सार्‍यांना लस दिली जाणार आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन भारतीय बनावटीच्या लसी भारतामध्ये उपलब्ध आहेत. तर रशियाची स्फुटनिक वी ही देखील येत्या काही दिवसांत बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी लसीकरणासाठी बाहेर पडावं आणि शिस्तीमध्ये कोरोनाची लस टोचून घ्यावी यासाठी आवाहन केले जात आहे. नक्की वाचा:  COVID-19 Vaccination For 18-44 Age Group in India: भारतात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी CoWin Portal वर आपल्या पहिल्या कोरोना लसीकरणाची नोंदणी कशी करावी?

दरम्यान आता लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी आणि लसीचा तुटवडा पाहता अधिकाधिक लोकांना सुरक्षितपणे लस देता यावी म्हणून कोविन या अ‍ॅपवर लॉगिन करून अपॉईंटमेंट घेऊनच लसीकरण केंद्रांवर यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. आता ऑक ईन पद्धत रद्द करण्यात आली आहे. सरकारकडून शासकीय रूग्णालयात लस मोफत उपलब्ध आहे तर खाजगी रूग्णालयात सशुल्क लस उपलब्ध आहे. सध्या लसीकरणामध्ये सहभागी होताना नागरिकांना प्रत्येक लसीचे विशिष्ट दिवसांच्या अंतराने 2 डोस घेणं आवशय्क आहे.