Cognizant Offering 2.5 LPA to Freshers: सर्वसामान्यपणे आयटी कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्या पगाराचे पॅकेज देण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र कोरोना महामारीनंतर परिस्थिती बदलली. अनेक कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरु झाली व कर्मचाऱ्यांच्या पगारातही घट झाली. आता एक मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेली कॉग्निझंट (Cognizant) कंपनी, फ्रेशर्सना वर्षाला अवघ्या 2.50 लाख रुपयांचे पगार पॅकेज ऑफर करत आहे. म्हणजे महिन्याला फक्त 20,000 रुपयेदिले जात आहेत.

कॉग्निझंटच्या या सॅलरी पॅकेजची सोशल मीडियावर प्रत्येकजण खिल्ली उडवत आहे. कॉग्निझंटच्या नुकत्याच आयोजित केलेल्या ऑफ-कॅम्पस भरती मोहिमेने सोशल मीडियावर बरीच चर्चा निर्माण केली आहे. विशेषत: जेव्हा कंपनीने फ्रेशर्सना वेतन पॅकेज ऑफर केले, तेव्हा कॉग्निझंटची चेष्टा तर झालीच मात्र टीकाही झाली.  कॉग्निझंट आयटी कंपनीने 2024 बॅचच्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी 2.5 लाख रुपये वार्षिक वेतन जाहीर केले. ही रक्कम भारताच्या आयटी क्षेत्रात साधारणपणे दिल्या जाणाऱ्या 3.5 लाख ते 4 लाख रुपयांच्या सरासरी वार्षिक पगारापेक्षा खूपच कमी आहे. (हेही वाचा: White-Collar Jobs: मंदीचा IT क्षेत्राला मोठा फटका; नोकऱ्यांमध्ये होत आहे घट, व्हाईट कॉलर नोकऱ्यांसाठीच्या रिक्त जागा 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर)

या भरतीबाबत कॉग्निझंटने एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये म्हटले आहे- ‘कॉग्निझंटने 2024 बॅचच्या उमेदवारांकडून अर्ज मागवून एक रोमांचक ऑफ-कॅम्पस मास हायरिंग ड्राइव्हची घोषणा केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट आहे. यामध्ये पगाराचे पॅकेज वर्षाला 2.52 लाख रुपये आहे.’ ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर, विशेषत: X (ट्विटर) वर वापरकर्त्यांनी या ऑफरवर जोरदार टीका करायला सुरुवात केली. अनेकांनी सांगितले की, आजकाल छोट्या छोट्या दुकानात काम करणारे लोकही यापेक्षा जास्त कमावतात.

दरम्यान, कॉग्निझंटच्या स्पर्धक विप्रोने 2024 बॅचच्या बीसीए (BCA) आणि बीएससी (BSc) पदवीधरांसाठी 'वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम' सादर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, पहिल्या वर्षी सामील होण्यासाठी 75,000 रुपये बोनस आणि 15,000 रुपये मासिक स्टायपेंड दिले जाईल, जे एकूण 2.6 लाख रुपये वार्षिक आहे. मात्र, दुसऱ्या वर्षी, स्टायपेंड दरमहा 17,000 पर्यंत वाढेल आणि एकूण वार्षिक उत्पन्न 2.1 लाख प्रदान न्केले जाईल. यामध्ये बोनसचा समावेश नाही. हे संपूर्ण प्रकरणदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.