बुधवार, 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3) चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाले आहे. या घटनेमुळे देशाने इतिहास रचला आहे. ज्या वेळी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार होते, त्या वेळी लाखो लोक इस्रोचे (ISRO) हे मिशन विविध माध्यमातून ‘थेट’ पाहत होते. लोकांमध्ये या मिशनबद्दल इतका उत्साह होता की, लाखो लोक ही संपूर्ण प्रक्रिया इस्रोच्या यूट्यूब चॅनलवरही लाइव्ह पाहत होते. आता इस्रोचे यूट्यूब चॅनलने विक्रम प्रस्थापित केला आहे. हे जगातील सर्वाधिक लाइव्ह पाहिले गेलेले यूट्यूब चॅनेल ठरले आहे.
आज संध्याकाळी साधारण 5.15 च्या सुमारास जेव्हा इस्रोच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह सुरू झाले तेव्हा दहा लाख लोक ते पाहत होते. थोड्या वेळाने 5.20 वाजता ही संख्या 20 लाखांच्या जवळ पोहोचली आणि त्यानंतर दहा मिनिटांनी साडेपाच वाजता तब्बल 30 लाख लोक इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावरील लँडिंग लाईव्ह पाहत होते. संध्याकाळी 5.41 वाजता ही संख्या 41 लाखावर पोहोचली.
हा एक ऐतिहासिक क्षण होता आणि तो कोणालाही चुकवायचा नव्हता. अशा प्रकारे विक्रमी संख्येने लोकांनी चांद्रयान-3 ची लँडिंग प्रक्रिया इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर थेट पाहिली. यापूर्वी, लाइव्हद्वारे सर्वाधिक पाहिले गेलेले चॅनल 6.3 दशलक्षासह शीर्षस्थानी होते. मात्र आज इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर तब्बल 6.6 दशलक्षाहून अधिक लोकांनी चांद्रयान-3 च्या लँडिंगचे दृश्य लाइव्ह पाहिले आहे. अशा प्रकारे इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर चांद्रयान-3 च्या लँडिंगदरम्यान लाइव्ह वापरकर्त्यांच्या संख्येने यूट्यूबचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. (हेही वाचा: Chandrayaan 3 Lands Successfully on Moon: भारतासाठी ऐतिहासिक क्षण; चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग, ISRO च्या प्रयत्नांना मोठे यश)
इस्रोचे यूट्यूब चॅनल आणि टीव्हीव्यतिरिक्त डिस्ने प्लस हॉटस्टार आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरही चांद्रयान-3 थेट दाखवण्यात आले. दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. त्याचबरोबर चंद्रावर यशस्वी उतरणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका, माजी सोव्हिएत युनियन आणि चीनने हा पराक्रम केला आहे. चांद्रयान-3 ने चंद्रावर जाण्यासाठी 14 जुलै रोजी उड्डाण केले होते.