Tinder युजर्ससाठी मोठी बातमी; आता या Dating App वर Ex, नातेवाईक अथवा ओळखीच्या कोणाला दिसणार नाही तुमची प्रोफाईल, आले नवे फिचर
Tinder App (Photo Credits-Twitter)

टिंडर (Tinder) हे जगभरात वापरले जाणारे एक अतिशय लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप (Dating App) आहे. जर आपणही टिंडर वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. डेटिंग अ‍ॅप वापरकर्त्यांना नेहमीच भीती असते की, त्यांना अशा डेटिंगच्या अ‍ॅप्‍सवर त्यांचे नातेवाईक, जवळचे मित्र किंवा माजी प्रियकर अथवा प्रेयसी पाहतील व जज करतील. आपण जर का डेटिंगसाठी आणि आपल्या एकाकीपणावर मात करण्यासाठी टिंडरचा वापर करत असाल तर आता आपल्याला अशा समस्यांबद्दल घाबरण्याची गरज नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून युजर्स ज्या फिचरची मागणी व अपेक्षा करत होते असे फिचर टिंडरने लाँच केले आहे. हे फिचर आहे ‘ब्लॉक’ (Block) फिचर.

ब्लॉक फिचरच्या मदतीने यापुढे टिंडर डेटिंग अॅपवर आपले कोणतेही परिचित, मित्र किंवा नातेवाईक आपल्याला पाहू शकणार नाही. या फिचरचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त लोकांना अवरोधित करू शकता. याबाबत टिंडरने सांगितले की, आमचे डेटिंग अ‍ॅप ही लोकांची पर्सनल स्पेस आहे. जर याठिकाणी युजर्सना त्यांचे कझिन्स, मित्र किंवा नातेवाईक यांनी पाहिले तर कदाचित ते त्यांच्याबद्दल चुकीची समजूत करून घेऊ शकतील. म्हणूनच आम्ही नवे ब्लॉक फिचर घेऊन आलो आहोत.

अशा व्यासपीठावर नेहमीच ओळखीचे लोक दिसतात कारण तुम्हाला माहित नसते की तुमची प्रोफाईल नक्की कोणाला दिसत आहे. टिंडरने आपल्या वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या नवीन फिचरमध्ये वापरकर्त्यास स्वातंत्र्य असेल की ते त्यांच्या फोनवर असलेले सर्व संपर्क या अॅपमध्ये ब्लॉक करू शकतील. तुमच्या संपर्क यादीमधील अशा लोकांना तुम्ही इथे ब्लॉक करू शकता,  ज्यांना तुमची प्रोफाईल दिसू नये अशी तुमची इच्छा आहे. (हेही वाचा: Google ने मागितली जाहीर माफी; भारतामधील सर्वात कुरूप भाषा म्हणून केला होता 'कन्नडा'चा उल्लेख)

यासाठी, आपल्याला आपल्या डिव्हाइसची संपर्क यादी टिंडरसह शेअर करावी लागेल. तुमच्या संपर्क यादीमधील नंबरवर क्लिक करून तुम्ही त्या व्यक्तीला टिंडरवर ब्लॉक करू शकता. यामधील विशेष गोष्ट म्हणजे आपण ज्या व्यक्तीस ब्लॉक केले आहे, त्या व्यक्तीला याचे नोटिफिकेशन मिळणार नाही.