भारतातील एक टॉप स्ट्रीमिंग सर्व्हिस डिस्ने प्लस हॉटस्टारने (Disney Plus Hotstar) आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत तब्बल 4.6 दशलक्ष म्हणजेच 46 लाख सदस्य गमावले आहेत. विदेशी ब्रोकरेज सीएलएसएच्या (CLSA) अहवालात ही माहिती समोर आली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या सदस्यांची संख्या आता 52.9 दशलक्षपर्यंत खाली आहे, तर एआरपीयू (ARPU) 48 रुपयांपर्यंत घसरला आहे. यामुळे प्रति ग्राहक जाहिरात महसूल मोठ्या प्रमाणावर कमी झाला.
सीएलएसएने म्हटले आहे की, डिस्ने प्लस हॉटस्टारची सदस्य संख्या कमी होणे आणि एआरपीयूमधील घट यामागे महत्वाचे कारण म्हणजे, डिस्ने प्लस हॉटस्टारने आयपीएलचे (IPL) डिजिटल अधिकार गमावणे हे आहे.
आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत, कंपनीने 157.8 दशलक्ष ग्राहकांची नोंद केली, जी मागील तिमाहीत 161.8 दशलक्ष होती. 1 एप्रिल 2023 पर्यंत, डिस्ने प्लस हॉटस्टारचे 52.9 दशलक्ष सशुल्क सदस्य होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या Viacom18 ने 2023 पासून पाच वर्षांसाठी भारतातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आयपीएलचे मीडिया हक्क मिळवले आहेत. गेल्या पाच वर्षांत डिस्ने स्टारकडे आयपीएलचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार होते. आयपीएलचे हक्क गमावल्यानंतर कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, जाहिरातींच्या कमाईमुळे डिस्ने प्लस हॉटस्टारचा प्रति ग्राहक सरासरी मासिक महसूल $0.74 वरून $0.59 वर घसरला आहे. (हेही वाचा: Elon Musk to Step Down Twitter: एलन मस्क होणार पायऊतार, ट्विटरला सहा आठवड्यात मिळणार नवा CEO)
दरम्यान, जिओ सिनेमा (JioCinema) हे बाजारात एक लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप बनले आहे. यंदा 2023 च्या पहिल्या तिमाहीत याचे 10 दशलक्ष पेक्षा जास्त सदस्य झाले आहेत. या अॅपच्या लोकप्रियतेमध्ये योगदान देणारा मुख्य घटक म्हणजे 'आयपीएल' हे आहे. नुकतेच व्यासपीठाने आईपीएलचे हक्क विकत घेतले आहेत. यामुळे डिस्ने+ हॉटस्टारवरील अनेक ग्राहक जिओ सिनेमाकडे ओढले गेले आहेत.