
भारताचे टेक हब म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू (Bengaluru) हे आतापर्यंत आयटी व्यावसायिकांसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण राहिले आहे. मात्र आता हे शहर सध्या आयटी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील नोकरकपातीमुळे गंभीर रोजगार संकटाचा सामना करत आहे. अहवालानुसार, 2024 मध्ये, 50,000 हून अधिक आयटी कर्मचारी नोकरीवरून काढले गेले आहेत, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला आहे.
हजारो कामगार येथे पेइंग गेस्ट (पीजी) निवासस्थानांमध्ये आणि कमी किमतीच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहतात, परंतु आता मोठ्या प्रमाणात होणाऱ्या टाळेबंदीमुळे आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि ऑटोमेशनच्या वाढत्या प्रभावामुळे शहराला सर्वात गंभीर रिअल इस्टेट संकटाचाही सामना करावा लागत आहे.
अहवालानुसार, या संकटाचा परिणाम केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होत नाही, तर बेंगळुरूच्या गृहनिर्माण बाजारपेठेचे, रिअल इस्टेट गुंतवणूकीचे आणि स्थानिक व्यवसायांचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे. येत्या काही आठवड्यात आणि महिन्यांत आयटी क्षेत्रात आणखी नोकरकपात होऊ शकते. विशेषतः, कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल. असे कर्मचारी सहसा स्वस्त पीजी आणि बजेट रेंटल अपार्टमेंटमध्ये राहतात आणि खर्च कमी करण्यासाठी कंपन्यांकडून त्यांनाच कामावरून काढून टाकले जात आहे.
एआय आणि ऑटोमेशनमुळे अनेक एंट्री-लेव्हल प्रोग्रामर आणि सॉफ्टवेअर टेस्टर्सना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आता कंपन्या कोडिंग, डीबगिंग आणि सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनसाठी एआय सिस्टम वापरत आहेत, ज्यामुळे खर्च कमी होतो आणि कामाची गती आणि अचूकता वाढते. आयटी कर्मचाऱ्यांच्या कपातीचा थेट परिणाम पीजी आणि भाड्याच्या घरांच्या मागणीवर झाला आहे. मोठ्या संख्येने टेक पार्क आणि कॉर्पोरेट कार्यालये असलेले आऊटर रिंग रोड (ORR) परिसर सर्वाधिक प्रभावित होत आहे. (हेही वाचा: DHL Layoffs 2025: महाकाय जर्मन लॉजिस्टिक्स कंपनी डीएचएल 8 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; काय आहे यामागील कारण? जाणून घ्या)
या ठिकाणी आयटी व्यावसायिकांची सतत मागणी असेल असा विचार करून अनेक गुंतवणूकदारांनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये गुंतवले होते, परंतु नोकऱ्यांमध्ये कपात आणि कर्मचाऱ्यांनी शहर सोडल्यामुळे घरे रिकामी होत आहेत आणि मालमत्तेच्या किमती घसरत आहेत. भाडेकरूंच्या संख्येत 30% घट झाल्यामुळे पेइंग गेस्ट (PG) आणि होस्टेल्सच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे घरमालक आणि रिअल इस्टेट गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात घट झाली आहे. या संकटामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे, ज्यामुळे शहराच्या विकासाच्या दीर्घकालीन शाश्वततेबद्दल चिंता वाढली आहे.