
जगातील नामांकित ई-कॉमर्स कंपनी Amazon ने या लॉक डाऊन (Lockdown) मध्ये नोकर भरतीची घोषणा केली आहे. कंपनी भारतातील 50,000 लोकांना तात्पुरत्या स्वरूपात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. लॉक डाऊनमुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होताना दिसत आहे, यामुळे कर्मचार्यांची मागणी वाढली आहे. भारत सरकारने काही दिवसांपूर्वी कंटेनमेंट झोन सोडून इतर ठिकाणी सर्व वस्तूंच्या ऑनलाइन वितरणाला परवानगी दिली होती. त्यानंतर Amazon वरील उत्पादनांची मागणी वाढली आहे, अशात कंपनी आता 50 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
अॅमेझॉनने म्हटले आहे की, सध्याच्या सप्लाय चेन स्टाफसोबतच हे नवीन लोक काम करतील. हे 50,000 रोजगार वस्तू आणणे, पॅकिंग करणे, वस्तू पाठविणे आणि वस्तू पोहोचविणे या कामांशी संबंधित आहेत. कंपनीने अॅमेझॉन फ्लेक्स सर्व्हिस अंतर्गत या सर्व तात्पुरत्या नोकर्या सुरु केल्या आहेत. इतर कंपन्यांप्रमाणेच अॅमेझॉनलाही कोरोना विषाणूच्या साथीमुळे ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचार्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला आहे. (हेही वाचा: Amazon ने भारतामध्ये सुरु केली ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा; Swiggy आणि Zomato ला देणार टक्कर)
या हंगामी नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणारे लोक 1800-208-9900 वर किंवा seasonalhiringindia@amazon.com वर ईमेल करू शकतात. Amazon ने आपले एसोसिएट्स, पार्टनर्स, कर्मचारी आणि ग्राहकांना सुरक्षित वितरण करण्यासाठी मास्क परिधान करणे, दररोज तापमान तपासणी, सर्व साइटवरील स्वच्छता, वारंवार हात धुणे आणि स्वच्छता यांसारख्या गोष्टी अनिवार्य केल्या आहेत. दरम्यान, अॅमेझॉनने भारतात ऑनलाईन फूड सर्व्हिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे बेंगळूरू (Bengaluru) मध्ये अॅमेझॉन फूड सर्व्हिस सुरू केली जात आहे. आतापर्यंत अशा अन्न वितरण बाजारात स्विगी (Swiggy) आणि झोमॅटोचे (Zomato) वर्चस्व कायम आहे, मात्र आता अॅमेझॉन या दोघांनाही टक्कर देण्यासाठी मैदानामध्ये उतरत आहे.