
कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या संकटाचा ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. जगातील विविध देशांत या व्यवसायाला फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अशात अॅमेझॉनने (Amazon) भारतात ऑनलाईन फूड सर्व्हिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळुरू (Bengaluru) मध्ये अॅमेझॉन फूड सर्व्हिस सुरू केली जात आहे. आतापर्यंत अशा अन्न वितरण बाजारात स्विगी (Swiggy) आणि झोमॅटोचे (Zomato) वर्चस्व कायम आहे, मात्र आता अॅमेझॉन या दोघांनाही टक्कर देण्यासाठी मैदानामध्ये उतरत आहे. अॅमेझॉनने लोकांना स्वच्छ अन्नाचा पुरवठा करण्यासाठी आपचे स्वतःचे काही प्रमाण लावले आहेत.
अॅमेझॉनचा असा दावा आहे की, ज्या लोकांशी त्यांनी भागीदारी केली आहे, त्या ठिकाणी स्वच्छतेचे अगदी सर्व निकष पाळले जातात. अॅमेझॉनने यासाठी प्रमाणपत्र जारी केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सध्याच्या कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता, कंपनी अन्नाच्या स्वच्छतेसंदर्भात उच्च दर्जाचे नियम पाळत आहे. अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारे आपली अन्न वितरण सेवा सुरू केली आहे. नवीन सेवेचे उद्दीष्ट स्थानिक व्यवसायांना मदत करणे हे आहे, विशेषत: असे रेस्टॉरंट्स जे या लॉक डाऊनमुळे अडचणी आले आहेत. (हेही वाचा: OLA च्या 1400 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा मोठा निर्णय)
बेंगलोरमध्ये अॅमेझॉनने अन्न वितरण सध्या चार पिन कोडमध्ये उपलब्ध केले आहे, ज्यात 560048, 560037, 560066 आणि 5601033 यांचा समावेश आहे. मात्र कंपनीने जेथून फूड पॅकेजिंग होते अशा रेस्टॉरंट्सची यादी जाहीर केलेली नाही. यावर्षी फेब्रुवारीमध्येच अॅमेझॉनने या सेवेबद्दल सांगितले होते, मात्र लॉक डाऊनमुळे ती लांबणीवर पडली. मात्र आता पात्र ग्राहकांना ऑनलाईन ऑर्डर देण्यासाठी आपल्या App वर रेस्टॉरंट्सची यादी दिसू लागली आहे.