Amazon Pay (Photo Credits: IANS)

आता 2020 चा ऑगस्ट महिना चालू आहे आणि अजूनही शेअर बाजार थंडावलाच आहे. बँकांकडूनही केलेल्या बचतीबाबत काही विशेष रिटर्न्स मिळत नाहीत. तसेच एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) चा व्याजदरही लोकांना आकर्षित करत नाहीये. यासोबतच महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत, अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India) ची आर्थिक सेवा कंपनी Amazon Pay ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्यामधून आपण सोन्यात गुंतवणूक करू शकता. अ‍ॅमेझॉन पेच्या गोल्ड वॉल्ट सेवेद्वारे (Gold Vault Service) आता वापरकर्ते किमान 5 रुपयांचे डिजिटल सोने खरेदी करु शकतील.

या सुविधेसाठी, Amazon Pay ने सेफगोल्ड (SafeGold) बरोबर भागीदारी केली आहे. सेफगोल्ड 99.5 शुद्धतेसह 24 कॅरेट सोन्याची ऑफर देत आहे. या वैशिष्ट्यासह, Amazon ग्राहक कधीही डिजिटलपणे सोने खरेदी आणि विक्री करू शकतात. आपल्या सोन्याचा विमा काढण्यासाठी सेफगोल्डने सिक्योर लॉजिस्टिक्स आणि वॉल्ट सर्व्हिसेसमधील अग्रगण्य ब्रिंक्ससह भागीदारी केली आहे. अ‍ॅमेझॉन पेच्या आधीपासून पेटीएम, फोनपे, गुगल पे, मोबिक्विक, अ‍ॅक्सिस बँकेच्या मालकीचे फ्रीचार्ज असे अनेकजण त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन डिजिटल सोन्याची खरेदी व विक्री करण्याची सुविधा देत आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरस आर्थिक मंदीच्या काळात नोकरीची सुवर्णसंधी; Smartphone इंडस्ट्रीमध्ये डिसेंबरअखेर उपलब्ध होणार 50,000 Jobs)

Amazon Pay वरून डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी वापरकर्त्याला अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवरील अ‍ॅमेझॉन पे पेजवरील गोल्ड व्हॉल्ट चिन्हावर क्लिक करावे लागेल. यानंतर, वापरकर्त्याला सध्याच्या सोन्याच्या किंमतीसह सोने खरेदी करण्याचा आणि विक्री करण्याचा पर्याय दिसेल. आपल्याला किती सोन्याची खरेदी करायची आहे, ती रक्कम भरल्यानंतर, त्यात  किती सोने येईल ते दिसेल. यानंतर, आपणास 'प्रोसीड टू बाय' वर क्लिक करावे लागेल आणि पेमेंट करण्यासाठी नवी विंडो उघडेल. सोने विकत घेण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआयद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.