खुशखबर! भारतात होत आहे 5G नेटवर्कची ट्रायल; या शहरापासून होणार सुरुवात
5G (Photo Credits: Twitter/ Amdocs Network)

नुकतेच दक्षिण कोरिया, चीन यांसारख्या देशांनी 5 जी (5 G) नेटवर्क वापरायला सुरुवात करून, इतरांना सुखद धक्का दिला. आता इतर अनेक देश 5 जी वर काम करत आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बेबीस्टेप्स घेणाऱ्या भारताची प्रगती सध्या वाखाणण्याजोगी आहे. अशात खुशखबर म्हणजे भारत 5G नेटवर्कची ट्रायल घेण्याच्या तयारीत आहे. ज्या कंपन्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी स्पेक्ट्रम आणि लायसन्स वाटपाची परवानगी दूरसंचार विभागाने दिली आहे.

भारतात जूनपासून 5 G ची ट्रायल सुरु होणार आहे, यासाठी पुढच्या 10-15 दिवसांत लायसन्स वाटपाचे काम होणार आहे. रिलायन्स जिओ आणि सॅमसंग या दोन कंपन्या मिळून 5G ची ट्रायल घेणार आहेत. नोकिया आणि एयरटेल, एरिक्सन आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्या मिळून 5G सेवेची ट्रायल घेणार आहेत. सुरुवातीला फक्त तीन महिन्यांसाठी ही ट्रायल होणार आहे. त्यानंतर हा अवधी वाढवून वर्षभरासाठी याचा विचार केला जाईल. (हेही वाचा: 2G, 3G वापरून कंटाळा आला 4G झाले जुने; आता 5G येताच गतीमान होईल जगणे)

या ट्रायलची सुरुवात दिल्लीच्या कनॉट प्लेसपासून होणार आहे. या तीन महिन्यांच्या ट्रायल नंतर नेटवर्कची आवश्यकता किती आहे ते समजेल. दरम्यान 5 G मुळे एक पूर्ण लांबीचा HD चित्रपट काही सेकंदात डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. तसेच डिजिटल आणि वास्तवातील भौतिक वस्तू एकमेकांशी जोडल्या जातील.