5G Service in India: उद्यापासून सुरु होणार 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव; देशात येणार नवीन क्रांती, जाणून घ्या काय असेल इंटरनेटचा वेग
5G Mobile Network | (Photo courtesy: archived, edited, representative image)

देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव उद्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून सुरू होत आहे. यासोबतच 5G इंटरनेट क्रांतीचीही सुरुवात होईल. 5 जीमुळे इंटरनेट स्पीड सध्याच्या स्पीडपेक्षा किमान 10 पट जास्त वाढेल. दूरसंचार क्षेत्रातील तीन कंपन्या, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या लिलाव प्रक्रियेत सहभागी होत आहेत. याशिवाय गौतम अदानी यांच्या कंपनीनेही आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी या लिलावात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. सध्या टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश न करण्याची त्यांची योजना आहे.

तज्ज्ञांच्या मते, 5G इंटरनेटचा वेग 4G पेक्षा 10 पट आणि 3G पेक्षा 30 पट जास्त असेल. याशिवाय मोबाईल इंटरनेटवरील लोडही कमी होईल. अधिकाधिक इंटरनेट उपकरणे कमी क्षेत्रात कनेक्ट होऊ शकतील आणि याचा वेगावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. 5G च्या मदतीने पेमेंट सिस्टम अधिक मजबूत आणि वेगवान होईल. याशिवाय अनेक नवीन तंत्रज्ञानही समोर येणार आहे. येत्या काही दिवसांत इंटरनेट स्पीडमुळे ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीशी संबंधित व्हिडीओ पाहणेही शक्य होणार आहे.

NDTV प्रॉफिटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, इंटरनेटच्या डाउनलोड स्पीडच्या बाबतीत हा कालावधी 2G साठी 2.8 दिवस होता. 3G साठी, तो 2 तासांपर्यंत कमी झाला. 4G साठी साधारण 40 मिनिटे आणि आता 5G साठी तो 35 सेकंद असेल. सरासरी डाऊनलोड स्पीडबद्दल बोलायचे झाले तर 3G साठी 3MBPS, 4G साठी 14MBPS, LTE साठी 30MBPS आणि 5G साठी 100MBPS आहे. (हेही वाचा: Google Wallet: गूगल वॉलेट घेणार Google Pay ची जागा, अँड्रॉईड युजर्स साठी रोल आऊट करण्यास सुरुवात)

Jio, Airtel, Vodafone-Idea आणि Adani Group यांनी एकूण 21800 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जमा केली आहे. या लिलाव प्रक्रियेत 72 GHz स्पेक्ट्रमचा समावेश केला जाईल, ज्याची वैधता 20 वर्षे असेल. त्याची किंमत 4.3 लाख कोटी रुपये असेल. Airtel, Jio आणि Vodafone Idea मिळून 71 हजार कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे.