भारतीय संघ आणि क्रिकेटप्रेमींसाठी चिंताजनक बाब; सराव करताना कर्णधार विराट कोहली जखमी
Virat Kohli of India. (Photo Credits: Getty Images)

अखेर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (Cricket World Cup 2019) इंग्लंड येथे मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. येत्या 5 जूनला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघ आणि क्रिकेटप्रेमींसाठी एक चिंताजनक बाब आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जखमी झाला आहे. साउथेम्प्टन येथे सराव करताना त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली आहे. बीसीसीआय (BCCI) ने या जखमेबाबत कोणतीही माहिती दिली नाही, त्यामुळे याची तीव्रता लक्षात येत नाहीये.

सराव करताना विराटला जखम झाली, त्यानंतर ताबडतोब फ़िजिओ पॅट्रिक यांनी वेदनाशामक स्प्रे मारला व त्यानंतर बर्फाने जखमेवर शेक दिला. मैदानाबाहेर पडतानाही विराटचे जखम झालेले बोट बर्फाच्या पाण्यात बुडवले होते. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे भारताच्या पहिल्या सामन्याला अजून 3 दिवस अवकाश आहे, तो पर्यंत विराट ठीक होऊ शकतो अशी आशा आहे.

(हेही वाच: वर्ल्डकप 2019 च्या धूममध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचीही वर्णी)

दरम्यान, याआधी आयपीएलमध्ये जखमी झालेला केदार जाधव आता फिट आहे. तरीही तो दोन्ही सराव सामन्यांत सहभागी झाला नव्हता. तर अष्टपैलू विजय शंकरही जखमी झाल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात खेळू शकला नव्हता. गेले कित्येक दिवस या विश्वचषक सामन्यासाठी विराट मेहनत घेत आहे, मात्र आता अचानक उद्भवलेल्या विराटच्या या जखमेमुळे चिंता अजूनच वाढल्या आहेत.