अभिनेता मिलिंद सोमण याने जागतिक पातळीवर आयर्नमॅन हा किताब जिंकून जास्त कालावधी लोटला नाही, आता या पुरस्कारावर अजून एका महाराष्ट्रीयन व्यक्तीने आपले नाव कोरले आहे. विरार पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस शंकर उथळे (वय 39) यांनी मलेशिया येथे पार पडलेल्या, आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत विजयश्री प्राप्त केली आहे. अशा प्रकारचा किताब जिंकणारे शंकर उथळे हे पहिले पोलीस ठरले आहेत. याआधी 2015 साली अभिनेता मिलिंद सोमण, आयपीएस अधिकारी रवींद्र सिंघल आणि कृष्णप्रकाश यांनी आयर्नमॅन हा किताब पटकाविला आहे. आता यामध्ये विरारच्या या पोलिसाची भर पडली आहे.
आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धा ही जगातील सर्वात कठीण स्पर्धेपैकी एक मानली जाते. या स्पर्धेसाठी 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग व 42 किमी धावणे असे लक्ष्य असते. या स्पर्धेत न थांबता तुम्हाला तुमचे लक्ष्य 17 तासांच्या आत पूर्ण करावे लागते. या स्पर्धेसाठी शंकर उथळे हे मागील एक वर्षापासून तयारी करत होते. पोलीस विभागात गेली 14 वर्षे कार्यरत असणाऱ्या उथळे यांचे वजन आधी 92 किलो होते. मात्र या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी 6 महिन्यांत 30 किलो वजन कमी करून ते 60 वर आणले. रोज 5 तास सायकलिंग आणि कडक डायट यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. शेवटी 17 नोव्हेंबर रोजी मलेशिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत शंकर उथळे यांनी त्यांचे लक्ष्य 16 तास 15 मिनिटांमध्ये पूर्ण करून तिरंगा फडकविलाच. शंकर यांच्या पत्नी उज्वला यांचा देखील या यशात महत्वाचा वाटा आहे असे ते मानतात.
पोलीस शंकर उथळे यांनी पॅरिस देशामार्फत भारतामध्ये आयोजित केलेल्या 'ऑडॉक्स इंडिया रँडॉनर' या सायकल स्पर्धेत 200 किमी अंतर 11 तास 1 मिनीट, वलसाड गुजरात येथील स्पर्धेत 300 किमी अंतर 17 तास 16 मिनिटे, बडोदा येथे झालेल्या सायकल स्पर्धेत 600 किमी अंतर 38 तास 56 मिनिट तर पुणे येथे 400 किमी अंतर 25 तास अशी सायकल न थांबता चालवून स्पर्धा पूर्ण करून सुपर रेंडोनियर हा किताब मिळविला आहे.