सांगलीमध्ये पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा काल पहिला दिवस होता त्याच दिवशी स्पर्धेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला कुस्तीपट्टूंना बसला. ज्या सांगली जिल्ह्यातील क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे विजेचे बिल न भरल्याने लाईट कापण्यात आली. त्यामुळे क्रीडा संकुलचा परिसर अंधारात आहे. महिलांची कुस्ती स्पर्धा सुरु असताना देखील या ठिकाणी अंधार हा कायम होता. या ढिसाळ नियोजनामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 400 ते 450 मुलींची गैरसोय झाल्याचे समोर आले आहे. (Women Maharashtra Kesari 2023: पहिली महिला केसरी कुस्ती स्पर्धा, सांगली येथे आजपासून रंगणार थरार; क्रीडा वर्तुळात उत्सुकता शिगेला)
विजेचं बिल (Electricity Bill) न भरल्यामुळे क्रीडा संकुलाचा परिसर अंधारात राहिल्याचं समोर आलं आहे. तसेच ज्या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलीची जेवणाची सोय करण्यात आली होती त्या ठिकाणी खुर्च्यांची देखील सोय नसल्याने मुलींना खाली फरशीवर बसून जेवावे लागले. तसेच याठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील चांगली सोय नसल्याचे समोर आले आहे.
सांगलीत कालपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 50 , 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील महिला मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. यावेळी महत्त्वाचा बद्दल म्हणजे या सर्व स्पर्धा या मॅट वरच खेळवण्यात येणार आहे. मात्र या स्पर्धेच्या ढिसाळ नियोजनामुळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या 400 ते 450 मुलींची मोठी गैरसोय झालेली आहे.