Padma Awards 2020 Nominations’ List: Mary Kom ला पद्मविभूषण, PV Sindhu च्या नावाची पद्म भूषण साठी शिफारस; क्रीडा क्षेत्राच्या  इतिहासात यंदा पहिल्यांदा 9 महिला खेळाडूंच्या नावांची यादी पद्म पुरस्कारांसाठी विचाराधीन
PV Sindhu & Mary Kom (Photo Credits: Getty Images)

Padma Awards 2020 Nominations’ List: भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिला खेळाडू आणि सहा वेळा जागतिक अजिंक्यपद मिळवाणार्‍या मेरी कोम (Mary Kom) या जागतिक स्तरावर खेळणार्‍या बॉक्सरच्या नावाची शिफारस 'पद्मविभूषण'(Padma Vibhushan Award) या मानाच्या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. मेरी कोम सोबतच पद्म पुरस्कार 2020 च्या यादीमध्ये नऊ अन्य महिला खेळाडूंचादेखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पी.व्ही.सिंधू (PV Sindhu), कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat), क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि हॉकीपटू राणी रामपाल(Rani Rampal), नेमबाजपटू सुमा शिरुर, टेबल टेनिसस्टार मनिका बत्रा आणि ताशी-नुंगशी या जुळ्या बहिणींची नावं यंदा पद्म पुरस्कारांसाठी सुचवण्यात आली आहेत.

भारतीय क्रीडा मंत्रालयाने यंदा घेतलेल्या पुढाकारातून पद्म पुरस्कारांसाठी महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे. त्यानुसार मेरी कोमचं नाव 'पद्म विभूषण' म्हणजेच भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या यादीमधील दुसर्‍या क्रमांकांच्या पुरस्कारासाठी सुचवले आहे. यापूर्वी मेरी कोमला 2013 साली पद्मभूषण आणि 2016 साली पद्मश्रीने गौरवण्यात आलं आहे. तर जागतिक स्तरावर बॅटमिंटन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावणार्‍या पी. व्ही सिंधूच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी केली जाणार आहे. कुस्तीपटू विनेश फोगट, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू राणी रामपाल, नेमबाजपटू सुमा शिरुर, टेबल टेनिसस्टार मनिका बत्रा आणि ताशी-नुंगशी या जुळ्या बहिणींच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. पी.व्ही सिंधुला 2015 साली पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं आहे.

ANI Tweet

भारतामध्ये यापूर्वी विश्वनाथन आनंद, सचिन तेंडुलकर आणि सर एडमंड हिलरी यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र यंदा पद्म पुरस्कारांसाठी क्रीडा मंत्रालयाने शिफारस केलेल्या 9 खेळाडू या महिला आहेत. त्यांची यादी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे. दरवर्षी 26 जानेवारी म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली जातात. आता या 9 महिला खेळाडूंपैकी किती जणांच्या नावांची घोषणा होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.