
Roland Garros 2020 Women's Final: पोलंडची 19 वर्षीय खेळाडू इगा स्विएटेकने (Iga Świątek) फ्रेंच ओपनच्या (French Open) महिला टेनिसच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सोफिया केनिनचा (Sofia Kenin) पराभव करून इतिहास रचला. ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारी स्विएटेक पोलंडची (Poland) पहिली, महिला किंवा पुरुष, टेनिसपटू ठरली. अंतिम सामन्यात इंगा स्विएटेकने सोफिया केनिनला सलग दोन सेटमध्ये 6-4, 6-1ने पराभूत केले आणि फ्रेंच ओपन महिला एकेरीचे जेतेपद जिंकले. स्विएटेकने 8 ऑक्टोबर रोजी खेळण्यात आलेल्या सेमीफायनल सामन्यात अर्जेंटिनाची क्वालिफायर नादिया पोडोरोस्काचा 6-2, 6-1 असा पराभव करून ग्रँड स्लॅमची अंतिम फेरी गाठली होती. 1975नंतर डब्ल्यूटीए कॉम्प्यूटर रँकिंग सुरू झाल्यानंतर स्विएटेक रोलँड गॅरोसच्या महिला अंतिम फेरीत प्रवेश करणारी सर्वात कमी क्रमांकाची खेळाडू ठरली. स्विएटेकने अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित केनिनचा सलग सेटमध्ये अवघ्या एका तासामध्ये 24 मिनिटांत पराभव केला.
या वर्षाच्या सुरूवातीस 21 वर्षीय केनिनने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती, पण 19 वर्षीय आणि जगातील 53व्या क्रमांकाची खेळाडू स्विएटेकसमोर तिने आत्मसमर्पण केले. अशाप्रकारे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविणारी स्विएटेक पोलंडची पहिली खेळाडू ठरली. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणार्या ओपन युगातील ती सातवी बिगर मानांकित खेळाडू आहे. विजयानंतर जगातील 54वी स्विएटेक म्हणाली, "मी खूप आनंदी आहे. अखेर माझे कुटुंब येथे आले याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे."
दुसरीकडे, रोलँड गॅरोसच्या पुरुष एकेरीत रविवारी 'किंग ऑफ क्ले' आणि 12 वेळ रोलँड गॅरोस विजेता राफेल नडाल आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित नोवाक जोकोविच यांच्यात फायनल सामना रंगेल. जोकोविच आणि नदाल यांच्यातील हा करिअरचा 56 वा सामना असेल. आजवर खेळल्या 55 सामन्यात जोकोविचने 29 आणि नडालने 26 सामने जिंकले आहेत. दोघांनी फ्रेंच ओपनमध्ये सात वेळा सामना केला असून नडालने सहा वेळा विजय मिळवला आहे. नडालने फ्रेंच ओपनमध्ये 101 सामन्यांत 99वा विजय मिळवले असून नडाल आता फ्रेंच ओपनमधील 13व्या विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे.