Nirmal Kaur Passes Away: माजी धावपटू Milkha Singh यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे Covid-19 मुळे निधन; होत्या महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार
Nirmal Kaur and Milkha Singh (Photo Credits: Twitter@singhaman1904 |File)

महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार आणि दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्या पत्नी निर्मल कौर (Nirmal Kaur) यांचे कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे निधन झाले आहे. मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. रविवारी दुपारी चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वत: मिल्खा सिंगही कोरोना इन्फेक्शननंतर त्याच रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. निर्मल कौर या 82 वर्षांच्या होत्या. रोम ऑलिम्पिकनंतर त्यांचे लग्न मिल्खा सिंगसोबत झाले होते. पतीला कोरोनाची लागण झाल्याच्या काही दिवसानंतर, निर्मल कौर यांचाही कोविड अहवाल सकारात्मक आला होता.

गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर चंदीगडमध्ये उपचार सुरू होते. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध गोल्फर जीव 22 मे रोजी दुबईहून चंदीगडला आले आहेत. तर अमेरिकेमध्ये राहणारी त्यांची मुलगी मोना मिल्खा सिंगदेखील इथेच आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने कुटुंबीयांनी निर्मल यांना 26 मे रोजी मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले होते. 30 मे रोजी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सामान्य वॉर्डमधून आयसीयूमध्ये हलविण्यात आले. त्यांची वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता सतत वाढत होती.

डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही निर्मल मिल्खा सिंग यांना ठीक करता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर कोरोना प्रोटोकॉलद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले. 17 मे रोजी मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता आणि 31 मे रोजी त्यांची चाचणी नकारात्मक आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. मात्र, नंतर श्वास घेण्यास अडचण आल्यामुळे त्यांना चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा: लोकप्रिय युट्यूबर Bhuvan Bam वर कोसळला दुःखाचा डोंगर; Covid-19 मुळे आई-वडिलांचे निधन, म्हणाला- 'सर्व काही विखुरले')

रविवारी रात्री चंदीगडचे पीजीआयएमईआरचे संचालक जगत राम यांनी मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणले की, मिल्खा सिंग यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशनमध्ये सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, अनेक राजकारणी आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी निर्मल मिल्खा सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.