टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौर (Kamalpreet Kaur ) हिला 29 मार्चपासून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रतिबंधित पदार्थांचा वापर केल्याबद्दल जागतिक ऍथलेटिक्स (World Athletics- WA) ने तिच्यावर ही कारवाई केली. या निर्णयानुसार पुढील तीन वर्षे तिच्यावर बंदी असेल. डब्ल्यूएच्या अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (एआययू) ने बुधवारी (12 ऑक्टोबर) आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या निर्णयात म्हटले आहे की, कमलप्रीत कौर हिने डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. त्यासोबतच दंडही स्वीकारला आहे. त्यामुळे नियमांनुसार आणि परवानगीनुसार चार वर्षांची संबंधित शिक्षा एका वर्षाने कमी करण्यात आली आहे.
पटियाला येथे AIU ने 7 मार्च रोजी गोळा केलेल्या नमुन्यात कौर हिची स्टेरॉइड स्टॅनोझोलॉल चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर AIU ने 29 मार्च रोजी तिला तात्पुरते निलंबित केले. नव्या निर्णयानुसार 7 मार्चपासूनचे तिचे सर्व निकाल रद्द केले जातील. परिणामी तिला त्या तारखेपासून पुरस्कार आणि बक्षीस रक्कम गमवावी लागेल.
ट्विट
India's discus thrower Kamalpreet Kaur banned for three years for using prohibited substance
— Press Trust of India (@PTI_News) October 12, 2022
कमलप्रीत कौर हिला तिची चूक स्वीकारण्याआधी आणि शिफारस केलेल्या शिक्षेला सहमती देण्यापूर्वी एका प्रदीर्घ चाचणीला सामोरे जावे लागले. वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) 2021 च्या संहितेनुसार, एखाद्या खेळाडूला जास्तीत जास्त चार वर्षांच्या शिक्षेतून एक वर्षाची कपात करण्यासाठी विनंती करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी संबंधित खेळाडूला आरोप लावल्यानंतर 20 दिवसांच्या आत नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य करावे लागते.