एशियाड सुवर्णपदक विजेता बजरंग पुनिया यांना मिळणार राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार
बजरंग पुनिया (Photo Credit: IANS)

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव करणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांना राजीव गांधी खेल रत्न (Khel Ratna) पुरस्कार जाहीर झाला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी पुनिया आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्या नावांची शिफारस केली होती. याच्यानंतर बजरंगला खेलरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद (Dhyan Chand) यांचा वाढदिवस 2 सप्टेंबर रोजी खेळ पुरस्कार देण्यात येतात. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हा देशातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार आहे. या पुरस्कारात खेळाडूला पदक, प्रशस्तिपत्र आणि साडेसात लाख रुपये दिले जातात. (Khel Ratna Award 2019: हरभंजन सिंह याच्या मागणी नंतर पंजाब सरकारने दिले चौकशीचे आदेश, क्रीडा विभाग लागला कामाला)

पूनियाने नुकतेच तिबिलिसी ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 65 किलो गटात इराणच्या पेमन बिबयानीला पराभूत करत त्याने सुवर्ण कामगिरी केली होती. पुनियाने मागील वर्षी आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. मागील वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टरपटू मीराबाई चानू यांना हा पुरस्कार मिळाला होता. मागील वर्षी पूनियाने आपल्याला खेल रत्न न मिळाल्याने नाराज झाला होता. आणि तत्कालीन क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांची भेट घेत निराशा व्यक्त केली होती.

चीनच्या शीआन येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विजय मिळवत पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीपटू पुनियाने आशियाई सर्किटमध्ये आपल्या अधिकारावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पहिला खेल रत्न पुरस्कार मिळवण्याचा मन बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांना मिळाला होता. 1991-92 मध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल खेल रत्नच्या पहिल्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.