भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडला पराभूत करत मिळवले ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेचे जेतेपद, आता लक्ष्य Tokyo 2020
(Photo Credit: @TheHockeyIndia/Twitter)

भारतीय पुरुष हॉकी (India Men's Hockey Team) संघाने राऊंड रॉबीनमधील पराभवाचा बदला म्हणून न्यूझीलंडला (New Zealand) अंतिम फेरीत 5-0 असे पराभूत करून ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेचे (Olympic Test Event) जेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत सिंह याने सातव्या मिनिटाला पहिला गोल केला तर शमशेर सिंह याने 18 व्या, निलकांत शर्मा याने 22 व्या, गुरसाहिजजित सिंह याने 26 व्या आणि मनदीप सिंह याने 27 मिनिटाला पर्येकी एक-एक गोल केले. याआधी राऊंड रॉबीन फेरीमध्ये न्यूझीलंडने 2-1 अशा फरकाने भारताला पराभूत केले होते. दोन्ही संघांनी सावधपणे खेळायला सुरुवात केली. भारताला सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण, यात गोल होऊ शकला नाही. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने त्याच मिनिटाला दुसर्‍या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली.

भारतीय संघाने बॉलवर नियंत्रण ठेवले आणि पहिल्या क्वार्टरमध्ये सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवली. पेनल्टी कॉर्नरवर शमशेरने 18 व्या मिनिटाला भारतासाठी दुसरा गोल केला आणि भारताची आघाडी 2-0 ने मजबूत केली. दुसर्‍या क्वार्टरमध्ये किवी खेळाडूंना केवळ दोनदाच भारताच्या वर्तुळात प्रवेश करता आला. आणि याच दरम्यान भारताने तीनवेळा किवींच्या वर्तुळात आगेकूच केली. 22व्या मिनिटाला गुरसाहीबजीत आणि मनदीपच्या पासवर निलकांताने गोल केला. यानंतर, तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतीय गोलकीपरने दमदार कामगिरीसह न्यूझीलंडला गोल करण्याची एकही संधी दिली नाही.

यानंतर भारतीय संघाचे पुढील लक्ष्य असेल ते ऑलिम्पिकसाठीची पात्रता फेरी जिंकण्याची. एफआईएच (FIH) ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचा विजेता संघ 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी (Olympic) आपले स्थान सुरक्षित करेल. ही पात्रता स्पर्धा या वर्षाच्या शेवटी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ऑलिम्पिक पात्रतापूर्वआधी हॉकी संघांना या ऑलिम्पिक टेस्ट सामन्यात खेळायचे बंधन कारक होते.