Hockey World Cup Anthem Song : रेहमान-शाहरुख येणार एकत्र
शाहरुख खान (Photo Credit : Instagarm)

'चक दे इंडिया' या सिनेमात हॉकी कोच ही भूमिका साकारल्यानंतर बॉलिवूडचा बादशाहा लवकरच हॉकी वर्ल्ड कपचा हिस्सा होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हॉकी वर्ल्ड कप 2018 च्या अँथम सॉन्गमध्ये प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमानसोबत शाहरुख खान झळकणार आहे. हे गाणे ए.आर. रेहमान संगीतबद्ध करत असून या गाण्याच्या व्हिडिओत रेहमान-शाहरुखची जोडी पाहायला मिळणार आहे.

प्रथमच शाहरुख खान संगीतकार रेहमान दिग्दर्शित अँथम सॉन्गच्या व्हिडिओत काम करणार आहेत. 'जय हिंद हिंद, जय इंडिया' असे गाण्याचे बोल आहेत. हे गाणे गुलजार यांनी लिहिले आहे.

रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी दौऱ्यावरुन भारतीय टीम परतल्यावर हा म्युझिक व्हिडिओ ऑक्टोबरच्या अंतपर्यंत प्रदर्शित करण्यात येईल. "भारताच्या हॉकी टीम आणि रेहमानसोबत घालवलेला वेळ अविस्मरणीय होता," असे शाहरुखने पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारतात हॉकी वर्ल्ड कपला 27 नोव्हेंबर 2018 पासून रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात होईल. रेहमान आणि शाहरुखच्या लाईव्ह परफॉर्मेंसची देखील चर्चा आहे. 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या दरम्यान ओडिसाच्या कलिंगा स्टेडिअमवर वर्ल्ड कपचे सामने रंगतील. यात जगातील 16 टीम्स सहभागी होणार आहेत.