Glasgow 2026 Commonwealth Games: आगामी 2026 मध्ये ब्रिटनमधील ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून (Commonwealth Games 2026) अनेक खेळ काढून टाकण्यात आले आहेत. ग्लासगोमध्ये एकूण 10 खेळांसाठीच खेळाडूंमध्ये स्पर्धा होणार आहे. हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी यासारखे प्रमुख खेळ ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा 2026 मध्ये नसतील. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने (CGF) मंगळवारी कार्यक्रम बजेट-अनुकूल ठेवण्यासाठी 10 खेळांची यादी जाहीर केली. संपूर्ण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लासगोमधील फक्त चार ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. 2022 च्या बर्मिंगहॅम आवृत्तीच्या तुलनेत यावेळी एकूण 9 कमी खेळ असतील. 2014 च्या आवृत्तीनंतर 12 वर्षांनंतर ग्लासगो राष्ट्रकुल खेळाचे आयोजन करणार आहे. मेगा-इव्हेंटची 23 वी आवृत्ती 23 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
बीबीसीचे स्पोर्ट्स एडिटर डॅन रोन यांच्या मते, पुढील कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्या खेळांचा समावेश होणार नाही ते पुढीलप्रमाणे आहेत-
हॉकी
स्क्वॅश
रग्बी-7
क्रिकेट
बीच व्हॉलीबॉल
डायव्हिंग
बॅडमिंटन
टेबल टेनिस
कुस्ती
ट्रायथलॉन
मॅरेथॉन, रोड सायकलिंग आणि BMX (सायकल शर्यत)
यापूर्वी 2022 मध्ये, 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण 72 देशांनी भाग घेतला होता. त्या वर्षी, खेळाडूंनी 19 खेळांमध्ये 283 पदकांसाठी स्पर्धा केली, ज्यामध्ये 4500 हून अधिक खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 178 पदके जिंकली असून त्यापैकी 57 सुवर्णपदके आहेत. त्या वर्षी इंग्लंड दुसऱ्या, कॅनडा तिसऱ्या आणि भारत चौथ्या क्रमांकावर होता.
ग्लासगो येथे ज्या खेळांमध्ये पदक जिंकण्याची स्पर्धा असेल त्यात ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्स, पोहणे आणि पॅरा स्विमिंग, कलात्मक जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल यांचा समावेश आहे. याशिवाय बॉक्सिंग, ज्युडो बॉल आणि पॅरा बॉल्स, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग 3x3, बास्केटबॉल आणि 3x3 व्हीलचेअर बास्केटबॉलच्या स्पर्धा ग्लासगोमध्ये होणार आहेत.
कॉमनवेल्थ गेम्स स्कॉटलंडने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की सर्व स्पर्धांची ठिकाणे सुमारे 12 किलोमीटरच्या आत असतील. पण शूटिंग रेंज ग्लासगोपासून 100 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे तेही यादीतून वगळण्यात आले. यातील अनेक खेळ काढून टाकण्यामागे आयोजकांनी कमी कालावधी आणि पैशांची कमतरता हे प्रमुख कारण सांगितले आहे. दरम्यान, हा बदल भारताच्या पदकांच्या संभाव्यतेला मोठा धक्का आहे, कारण मागील आवृत्त्यांमधील देशाची बहुतेक पदके ही काढून टाकलेल्या खेळांमधून आली आहेत. ऑस्ट्रेलियन राज्य व्हिक्टोरिया हे 2026 च्या आवृत्तीचे मूळ यजमान होते, परंतु वाढत्या खर्चामुळे त्यांनी गेल्या वर्षी माघार घेतली. यानंतर स्कॉटलंड यजमानपदासाठी पुढे आला.