
EURO 2020 Semi-Final Schedule: अनेक महिन्यांची प्रतीक्षा आणि नाट्यमय निकालांच्या मालिकेनंतर, युएफा यूरो (UEFA EURO) 2020 स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्याच्या जवळ येऊन पोहचली आहे. सध्या सुरू असलेल्या युरोपियन चॅम्पियनशिपच्या (European Championship) सेमीफायनल फेरीत चार संघांनी प्रवेश निश्चित केला आहे. युरोपच्या 11 देशांमध्ये खेळला जाणारा युएफा युरो 2020 स्पर्धा अंतिम टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. शनिवार 3 जून रोजी रात्री झालेल्या दोन उपांत्यपूर्व सामन्यांच्या निकालांसह पुढील फेरीतील लढतीचे चित्रही स्पष्ट झाले आहे. 24 संघासह सुरू झालेली स्पर्धा आता केवळ 4 संघांपर्यंत राहिली आहे. यूरो 2020 च्या क्वार्टर फायनल सामन्यात इटली (Italy) आणि स्पेनच्या (Spain) विजयानंतर डेन्मार्क (Denmark) व इंग्लंडनेही (England) आपापल्या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता या चार संघांच्या लढतीनंतर अखेरच्या दोन संघांचे चित्र स्पष्ट होईल ज्यांच्यात जेतेपदाची अंतिम लढत रंगेल.
11 जुलैपासून सुरू झालेल्या युरो 2020 च्या बाद फेरीतील उलटफेरमुळे अनेक विजेतेपदाचे मोठे दावेदार मानले जाणारे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. विश्वविजेता फ्रान्स आणि विद्यमान युरोपियन चॅम्पियन पोर्तुगाल अंतिम-16 मध्ये पराभूत झाले. त्याचबरोबर नंबर-1 संघ बेल्जियम उपांत्यपूर्व फेरीच्या पलीकडे जाऊ शकला नाही आणि पुन्हा एकदा प्रबळ दावेदार असूनही त्याला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. दुसरीकडे, सर्वांना आश्चर्यचकित करत डेन्मार्क सारख्या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत आता सेमीफायनलची स्पर्धा अधिक रोमांचक झाली आहे. आता सर्वांची नजर उपांत्य फेरीवर आहे. दोन्ही उपांत्य सामन्यांचे सामने लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर खेळले जाणार असून सेमीफायनलचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
7 जुलै, इटली विरुद्ध स्पेन, रात्री 12.30 वाजता, वेम्बली स्टेडियम, लंडन
8 जुलै, इंग्लंड विरुध्द्व डेन्मार्क, रात्री 12.30 वाजता, वेम्बली स्टेडियम, लंडन
इटली आणि स्पेन यांच्यातील पहिला उपांत्य सामना 2012 यूरो फायनलची पुनरावृत्ती ठरेल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यावेळी युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद कायम ठेवण्यासाठी स्पेनने इटलीचा पराभव केला होता. रॉबर्टो मॅन्सिनीच्या इटलीने म्यूनिचमध्ये बेल्जियमवर 2-1 अशी मात करुन युएफा यूरो 2020 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेन विरोधात लढत निश्चित केली. लंडनच्या वेम्बली येथे होणाऱ्या स्पर्धेच्या सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 चा विजेत्या संघात विजेतेपदाचा सामना खेळला जाईल. युएफा यूरो 2020 चा अंतिम सामना 12 जुलै रोजी वेम्बली येथे खेळला जाणार आहे.