दीपा कर्माकर (Photo Credit:IANS)

भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर (Deepa Karmakar) हिच्या 2020 टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) मधील सहभागावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दीपाला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याची माहिती तिचे प्रशिक्षक बिश्वेस्वर नंदी (Bisweswar Nandi) यांनी दिली. दीपाला मागील महिन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे मंगोलियायेथील झालेल्या आशियाई स्पर्धेला मुकावे लागले होते. 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करून दीपाने सर्व भारतीयांना जिम्नॅस्टीक्स खेळाकडे आकर्षित केले होते. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपाने प्रोदूनोव्हा वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास लिहिला होता. दीपा वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट होती. अंतिम फेरीत अवघ्या काही गुणांच्या फरकांनी तिचं कांस्यपदक हुकलं होतं. अंतिम फेरीत तिने चौथे स्थान पटकावले होते.

त्यानंतर 2017 मध्ये तिला दुखापतीनं ग्रासलं. 2017 च्या आशियाई आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर जुलै 2018मध्ये टर्की येथील आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक वर्ल्ड चॅलेंज स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत दीपाने पुनरागमन केले. याच स्पर्धेच्या बॅलेंस बिम प्रकारात तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण इथे तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

दरम्यान, डाव्या गुडघ्याची दुखापत आणि त्याच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे दीपा 2018च्या आशियाई स्पर्धेची पात्रता मिळवण्यात दीपा अपयशी ठऱली. त्यानंतर ती स्पर्धेबाहेरच आहे आणि आता 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागावरही संशय व्यक्त केला जात आहे.