China Open 2019: पीव्ही सिंधू, साई प्रणीथ यांची सरशी; सायना नेहवाल पराभूत
पीव्ही सिंधू (Photo by Robertus Pudyanto/Getty Images)

गतविजेत्या विश्वविजेत्या पीव्ही सिंधू (PV Sindhu) ने बुधवारी पूर्व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ली शुरुई (Li Xuerui) विरुद्ध सहज विजय मिळवत प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला. पण, सायना नेहवाल (Saina Nehwa) ला महिला एकेरीत पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे, आता चीन ओपन सुपर 1000 स्पर्धेतून सायना बाहेर पडली आहे. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सिंधूने ली शुरुईचा 21-18 21-12 असा अवघ्या 34 मिनिटांत पराभव केला. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूला जागतिक क्रमवारीत 20 व्या क्रमांकावर असलेल्या ली शुरुईला पराभूत करण्यात फारशी मेहनत करावी लागली नाही. ली शुरुईविरुद्ध सिंधूचा हा चौथा विजय आहे, तर अन्य तीन मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

दुसरीकडे, लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक जिंकणारी सायनाला जागतिक क्रमवारीत थायलंडच्या 19 व्या क्रमांकाच्या बुसानन ओंगबामरूंगपन (Busanan Ongbamrungphan)ने अवघ्या 44 मिनिटांच्या सामन्यात 10-21 17-21 ने पराभूत केले. जगातील माजी नंबर एक सायनाचा थायलंडच्या खेळाडूविरूद्ध हा सलग दुसरा पराभव आहे. दुखापतीतून सावरलेली 29 वर्षीय सायना पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. सायनाने इंडोनेशिया ओपनमध्ये विजयासह हंगामाची सुरूवात केली परंतु उर्वरित हंगामात बीडब्ल्यूएफ सर्किटमधील अन्य कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही.

पुरुष एकेरीत बी साई प्रणीथ (B Sai Praneeth) ने थायलंडच्या सुपान्यू अविहिंगसनन ला 21-19 21-23 21-14 असे पराभूत करून पुढील फेरीत प्रवेश केला. थायलंडच्या खेळाडूने प्रणीथला झुंज दिली पण विजय मिळवण्यात अपयश आले. प्रणव जेरी चोपडा आणि एन सिक्की रेड्डी या मिश्र दुहेरीत जोडीचा जर्मनीच्या मार्क लॅम्फस आणि इसाबेल हर्ट्रिक यांच्या विरुद्ध 12-21 21-23 असा पराभव झाला.