China: चीनची टेनिस स्टार Peng Shuai अचानक झाली गायब; United Nations ने मागितला ठावठिकाणा, WTA ने देशाला दिली 'ही' धमकी
Peng Shuai (Photo Credits: Twitter)

काही दिवसांपूर्वी चीनची (China) एक लोकप्रिय, व्यावसायिक टेनिसपटू पेंग शुई (Peng Shuai) ने एका माजी उच्च सरकारी अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा (Sexual Assault) आरोप केला होता. आता गेले काही दिवस पेंग शुई बेपत्ता आहे. याबाबत सोशल मिडियावर चर्चा सुरु असताना आपण सुरक्षित असल्याचा दावा करणारा तिचा इमेल समोर आला होता, परंतु त्यानंतर तिच्या सुरक्षेबाबत चिंता अजूनच वाढल्या आहेत. पेंग शुई अचानक गायब झाल्याने, देशभरातील खेळाडू आणि इतरांनीही तिच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यात आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की त्यांना या घटनेबाबत माहितीच नाही.

पेंग शुआईबाबत आजपर्यंत जगभरातून अनेक प्रश्न उभे राहिले आहेत, परंतु या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. याविषयी विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी शुक्रवारी बीजिंगमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले की, हा विषय राजनैतिक प्रश्न नाही आणि त्यांना या परिस्थितीची माहिती नाही. आता संयुक्त राष्ट्रांनी पेंग शुई बेपत्ता झाल्याप्रकरणात उडी घेतली आहे.

(हेही वाचा: अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश; जाणून घ्या किती आहे संपत्ती)

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने पेंग शुआई गायब झाल्याची चीन सरकारकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. यूएन राइट्स चीफ मिशेल बॅचेलेट म्हणाल्या- पेंग ठीक आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. तसेच लैंगिक छळाच्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी व्हायला हवी.

चीनचे माजी उपपंतप्रधान झांग गाओली यांच्यावर चीनची स्टार महिला टेनिसपटू आणि माजी विम्बल्डन चॅम्पियन पेंग शुईने 2 नोव्हेंबर रोजी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तेव्हापासून शुईबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, ती चिनी सोशल मीडियावरूनही बेपत्ता आहे. हे पाहता आता महिला टेनिस असोसिएशन (WTA) चे अध्यक्ष स्टीव्ह सायमन यांनी चीनसोबतचे सर्व व्यावसायिक संबंध संपुष्टात आणण्याची धमकी दिली आहे. टेनिस दिग्गज सेरेना विल्यम्सने शुईच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर स्टीव्हचे हे विधान समोर आले आहे. जगातील अव्वल पुरुष टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनेही महिला टेनिस असोसिएशनने दिलेल्या या धमकीला 100 टक्के पाठिंबा दर्शवला आहे.