Australian Open 2020: प्रजनेश गुणेश्वरन पहिल्या फेरीत गारद, एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात
प्रजनेश गुणेश्वरन (Photo Credit: ANI)

भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरन (Prajnesh Gunneswaran) याला वर्षातील पाहिलं ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open) पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी पहिल्या फेरीच्या सामन्यात त्यांना जपानच्या टात्सुमा इटो (Tatsuma Ito) ने 4-6, 2-6, 5-7 अश्या सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. 122 व्या क्रमांकावर असलेला प्रजनेश संपूर्ण सामन्यादरम्यान लयमध्ये दिसला नाही आणि 145 व्या क्रमांकाच्या इटोने त्याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. आता वाईल्ड कार्ड एन्ट्री करणाऱ्या इटोचा दुसर्‍या फेरीत गेटजेता आणि 7 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता नोवाक जोकोविचशी (Novak Djokovic) सामना होईल. एकेरीच्या सामन्यात एकमेव भारतीय असलेला डावखुरा गुणेश्वरन अव्वल दर्जाचा खेळ करू शकला नाही. यापूर्वी प्रजनेशने ग्रॅंड स्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये लकी लूजर म्हणून क्वालिफाय केले होते आणि ग्रँड स्लॅममधील मुख्य ड्रॉ स्पर्धेत खेळण्याची ही त्याची पाचवी वेळ होती. प्रजनेशच्या पराभवाने एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

पुरुष दुहेरीत भारताचा द्विज शरण आणि न्यूझीलंडचा आर्टेम सीताक यांचा सामना स्पेनच्या पाब्लो कर्रेनो बुस्ता आणि पोर्तुगालच्या जोआओ सोसा यांच्या जोडीशी होईल. दुसरीकडे, पहिल्याच सामन्यात रोहन बोपण्णा आणि जपानच्या यासुकाता उचियामा यांच्या सामोर 13 वे मानांकन अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायन या अनुभवी जोडीचे आव्हान असेल. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि युक्रेनची नादिया किचेनोक भिस्त चीनच्या हान झिनियुन आणि झू लिन यांचा सामना करतील. दोन वर्षानंतर टेनिस कोर्टावर परतलेलय सानियाने नादियासह नुकतंच होबर्ट आंतरराष्ट्रीय किताब जिंकला.

अन्य टेनिसपटूंबद्दल बोलायचे झाले तर टूर्नामेंटच्या पहिल्या दिवशी सेरेना विल्यम्स, रॉजर फेडरर, गरजेती नाओमी ओसाका, कॅरोलीन वोज्नियाकी, पेट्रा क्विटोवा आणि जोकोविच फेरीत स्थान मिळवले. आठव्या मानांकित सेरेनाने रशियाच्या अनास्तासिया पोटापोव्हाचा 6-0, 6-3 ने पराभव केला, तर सेरेनाची मोठी बहीण व्हेनसला तिच्या देशातील 69 व्या क्रमांकाची कोको गॉफविरुद्ध 6-7, 3-6 ने पराभवाला सामोरे जावे लागले.