अर्जेंटिनाचा प्रख्यात फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांच्या निधनानंतर काही दिवसांनी, पोलिसांनी त्यांचे डॉक्टर लिओपोल्डो ल्यूक (Leopoldo Luque) यांचे क्लिनिक व घरी छापा टाकला आहे. मॅराडोना हे जगातील सर्वाधिक चर्चेत आणि महान खेळाडू होते, त्यामुळे मॅराडोना यांच्या उपचारात काही निष्काळजीपणा तर झाला नाही ना, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हा छापा टाकला आहे. महान फुटबॉलर डिएगो मॅराडोनाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. ते 60 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने मॅराडोना यांचे निधन झाले होते. मॅराडोना यांना घरीच हृदयविकाराचा झटका आला होता. मृत्युच्या दोन आठवड्यांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती.
आता त्यांच्या मुलीने डॉक्टरांवर आरोप केला आहे की, तिच्या वडिलांना उपचारादरम्यान योग्य औषध दिले गेले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. मॅराडोनाच्या मुलीने मागणी केली आहे की, तिच्या वडिलांना जे औषध देण्यात येत होते त्याचा शोध घेतला जावा. नोव्हेंबरच्या सुरूवातीला त्यांच्या मेंदूतून रक्ताचे क्लोट काढून टाकण्यासाठी मॅराडोना यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. या व्यतिरिक्त दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठीही त्यांच्यावर उपचार केले जात होते.
आपण पोलिसांना तपासात मदत करत असल्याचे डॉ ल्यूक यांनी सांगितले आहे. मॅराडोनासाठी आपण शेवटपर्यंत सर्वकाही केल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे सुमारे 30 पोलिसांनी ल्यूकच्या घरावर छापा टाकला आणि इतर 30 जणांनी रविवारी सकाळी त्यांच्या क्लिनिकवर छापा टाकला. वकिलांच्या आदेशानुसार हा छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यामधून, मॅराडोनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नक्की काय घडले हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे म्हटले जात आहे की जेव्हा मॅराडोनाला रिकव्हरीसाठी घरी पाठवले गेले होते तेव्हा ते योग्य स्थितीत नव्हते आणि त्यांना त्यावेळी क्लिनिकमध्येच ठेवायला हवे होते. (हेही वाचा: अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर 'डिएगो मॅराडोना'चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मॅराडोनाचे वकील मटियास मोर्ला (Matias Morla) यांनी केली आहे. मोर्ला म्हणाले, मॅराडोनाच्या घरी रुग्णवाहिका पोहोचण्यास 30 मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाला. रुग्णालयाने उपचार करण्यासही उशीर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, 1986 मध्ये जेव्हा अर्जेटिनाने विश्वचषक जिंकला होता तेव्हा मॅराडोना कर्णधार होते. या वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध मॅराडोनाचे 'हॅन्ड ऑफ गॉड' गोल लोकप्रिय ठरला होता.