रशियाची स्टार महिला टेनिसपटू मारिया शारापोवा ने वयाच्या 32 व्या वर्षी जाहीर केली निवृत्ती, शेअर केली भावनिक पोस्ट
मारिया शारापोवा (Photo Credits: Getty Images)

पाच वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन रशियाची (Russia) महिला टेनिसपटू मारिया शारापोवा (Maria Sharapova_) ने व्यावसायिक खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. मारियाने वयाच्या 32 व्या वर्षी खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. शारापोवाने व्होग आणि व्हॅनिटी फेअरच्या लेखात लिहिले आहे की अलिकडच्या वर्षांत झालेल्या दुखापतींने तिला हा निर्णय घेण्यास भाग पाडले. मारियाने लिहिले, "टेनिस- आता मी तुम्हाला गुडबाय करतेय." वयाच्या 17 व्या वर्षी शारापोवा एका रात्रीत स्टार बनली जेव्हा तिने 2004 मध्ये सेरेना विल्यम्सला पराभूत करत विम्बल्डनचे (Wimbledon) जेतेपद जिंकले होते. निवृत्तीबाबत शारापोवा म्हणाली, "28 वर्ष आणि पाच ग्रँड स्लॅम जेतेपदानंतर मी नवीन उंची गाठायला आणि वेगळा प्रवास करण्यास तयार आहे. माझ्या यशाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कधीही मागे वळून आणि जास्त पुढे पाहिले नाही."

शारापोवाने मात्र या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करणार की नाही हे स्पष्ट केले नाही. तिने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) मध्ये अंतिम सामना खेळला होता. येथे पहिल्या फेरीत तिला 19 वी मानांकित सर्बियाच्या डोना वेचिककडून पराभव पत्करावा लागला होता. शारापोवा काही काळापासून खांद्याच्या दुखापतीपासून झगडत आहे. शारापोवाने 2012 मध्ये फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण केले. 2012 नंतर तिने 2014 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धाही जिंकली. 2006 मध्ये यूएस ओपन आणि 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यात तिला यश आले. पण, 2016 मध्ये शारापोवाला डोपिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल 15 महिन्यांसाठी बंदीला सामोरे जावे लागले होते. आणि एप्रिल 2017 मध्ये तिने टेनिस कोर्टावर पुनरागमन केले.

2005 मध्ये तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आणि ही कामगिरी करणार्‍या तिच्या देशातील पहिली महिला खेळाडू ठरली. तिच्या कारकीर्दीत शारापोवाने 278 कोटी रक्कम जिंकली आहे. 2003 ते 2015 पर्यंत दरवर्षी किमान एक एकल पदक जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.