National Sports Awards 2020 Live Streaming: ऑनलाइन सोहळ्यात पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण, कधी आणि कुठे पाहता येईल लाइव्ह टेलिकास्ट, ऑनलाइन स्ट्रीमिंग
रोहित शर्मा आणि मनिका बत्रा (Photo Credit: Getty/Instagram)

29 ऑगस्ट, संपूर्ण भारत हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा करतात. 2020 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतातील काही नामांकित क्रीडापटूंचा सन्मान केला जाईल. पण, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा मंत्रालयाने (Sports Ministry) यंदा हा पुरस्कार सोहळा वर्चुअल पद्धतीने पार पडणार असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते विविध खेळातील खेळाडू, प्रशिक्षकांचा गौरव केला जाईल. पारंपरिक राष्ट्रपती भवन ऐवजी 29 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिन ऑनलाईन साजरा केला जाईल. भारतात दरवर्षी हॉकी दिग्गज मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांच्या वाढदिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) म्हटले की 74 पुरस्कार प्राप्त झालेल्यांपैकी 65 विजेते देशातील कोरोना स्थितीमुळे त्याच्या केंद्रांमधून पहिल्यांदा वर्चुअल राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये सहभागी होतील, तर तीन कोविड-19 पॉसिटीव्ह खेळाडूंसह नऊ पुरस्कार विजेते या समारंभास उपस्थित राहणार नाहीत. (National Sports Awards 2020: यंदा वर्चुअल समारंभात होणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण, सात्विकसाईराज रंकीरेड्डीसह 3 कोरोना पॉसिटीव्ह विजेते ऑनलाईन सोहळ्याला मुकणार)

राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे पुरस्कार व्हर्च्युअल मोडमध्ये प्रदान करतील. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रपती भवनमधून उपस्थित राहतील, तर पुरस्कार विजेते देशभरातील विविध SAI केंद्रांवर उपस्थित राहतील. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे देशवासियांना हा कार्यक्रम टीव्ही वर लाईव्ह पाहता येणार आहे. ऑगस्ट 29, 2020, शनिवारी सकाळी 10:45 वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. या पुरस्कार सोहळ्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण दूरदर्शन वर पाहायला मिळेल, तर ऑनलाईन भारत सरकारच्या व्हिडिओ पोर्टल https://webcast.gov.in/myas/sportsawards/ वर पाहायला मिळेल.

क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma), पॅरालंपिक सुवर्णपदक विजेता मरियाप्पन थंगवेलु, टेबल-टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश आणि हॉकीपटू राणी यांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार तर 27 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि अन्य मान्यवर सोहळ्यासाठी विज्ञान भवनातून ऑनलाइन उपस्थित असतील. खेलरत्न विजेता रोहित शर्माही आयपीएलसाठी संयुक्त अरब आमिराती येथे गेले असल्यामुळे ऑनलाइन सोहळ्याला उपस्थित नसण्याची शक्यता आहे.