ISL 2020-21: गोव्यात आजपासून सुरु होणार फुटबॉल कार्निवल, पहिल्यांदा विजेते पदासाठी 11 संघात होणार लढत
आयएसएल ट्रॉफी (Photo Credit: Facebook)

ISL 2020-21: इंडियन सुपर लीगचा (Indian Super League) 7वा टप्पा आज, शुक्रवारी सुरू होत आहे. गोव्यात (Goa) यंदा संपूर्ण आयएसएल कार्निवलचे आयोजन केले जाईल. कोरोना काळात भारतात आयोजित होणारा हा पहिला मोठा स्पोर्टिंग इव्हेंट आहे. गोवा येथील 3 स्टेडियमवर प्रेक्षकांविना ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यंदा पूर्व बंगाल (East Bengal) संघ लीगमध्ये सामील झाल्यानंतर ट्रॉफीसाठी फुटबॉल चाहत्यांना 11 संघात विजेते पदासाठी लढत पाहायला मिळणार आहे. ATK-मोहन बगान एफसी (Mohun Bagan FC) आणि केरला ब्लास्टर्स (Kerala Blasters) यांच्यात स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. 115 सामन्यांनंतर पुढच्या वर्षी मार्च महिन्यात लीगचा अंतिम सामना खेळला जाईल. यंदाच्या स्पर्धेत एटीके मोहन बगान एफसी आणि ईस्ट बंगाल संघ पदार्पण करत आहेत. एटलेटिको डी कोलकाता संघ आयएसएलमध्ये (ISL) सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी 2014, 2016 आणि 2020 असे तीन आयएसएलचे विजेतेपद जिंकले आहेत व यंदा त्यांच्यासमोर त्यांचे विजेतेपद कायम ठेवण्याचे आव्हान असेल.

दरम्यान, मोहन बागान आणि केरला ब्लास्टर्स यांच्यातील सलामीचा सामना रंगतदार होण्याची पूर्ण शक्यता आहे. एटीके मोहन बागान या फ्रँचायझी-आधारित स्पर्धेची सुरुवात विजेते पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून करणार आहे. संघाने भारताचा स्टार डिफेन्डर संदेश झिंगन (कर्णधार) सारख्या काही स्तरीय खेळाडूंशी करार केला आहे. गेल्या मोसमातील ‘आयएसएल’ मधील तसेच आय-लीग फुटबॉलमधील अव्वल संघांचे एकत्रीकरण करण्यात आल्यानंतर एटीके मोहन बागान संघ (पूर्वीचा अ‍ॅटलेटिको डी कोलकाता) पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहेत आणि त्यांची फॅन फॉलोव्हिंगही पुरेशी आहे. स्पर्धेत ‘अ’ आणि ‘ब’ गटात प्रत्येकी चार तर ‘क’ गटात तीन संघ आहेत.

दरम्यान, एटीके आणि केरला ब्लास्टर्स संघ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. केरला संघाने दोन्ही वेळेला बाजी मारली असून तिसऱ्या सामन्याचा काय निर्णय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पहिला सामना गोव्याच्या बोम्बोलिमच्या जीएमसी स्टेडियममध्ये आयोजित केला जाईल. एटीके मोहन बागान फुटबॉल क्लबचे सह-मालक सौरव गांगुली यांनी गोव्यातील जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात आयएसएल अन्य खेळांना प्रेरणा देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.