India vs Australia 3rd T20 : कोहलीच्या अर्धशतकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव, मालिकेत 1-1 बरोबरी साधली
भारतीय खेळाडू (Photo Credits IANS)

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानात पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे. विराट कोहलीच्या नाबाद 61 धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया विरूध्दचा हा अखेरचा आणि निर्णयाक टी 20 सामना जिंकला आहे. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने आव्हान दिलेल्या 164 धावा यशस्वी पूर्ण करून मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंच (28) आणि डॉर्सी शॉर्टने (33) चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सलामीला 68 धावांची भागीदारीही रचली. परंतू हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनी काही खास कामगिरी केली नाही. तरी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 164 पर्यंत पोहचू दिले. यात पंड्याने चार गडी बाद केले तर कुलदीप यादवने कर्णधार फिंचची विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाने दिलेले 165 धावांचे आव्हान भारताने सलामीवीर शिखर धवन-रोहित शर्माची अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केले. भारताकडून फलंदाजीत सलामीवीर रोहित शर्माने 23 (16) तर शिखर धवनने 41 (22) धावा केल्या. विराटने 41 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच कार्तिकने 1षटकार आणि 1 चौकारासह 18 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या.

दरम्यान तीन टी 20 सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या भारताच्या विजयासह भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 1-1 ने बरोबरीत झाली आहे.