भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कपच्या (World Cup) निमित्ताने इंग्लंडमध्ये आहे. मात्र त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या घरात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. इकडे दुष्काळामुळे संपूर्ण देश कोरडा पडला आहे, अनेक राज्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे, मात्र विराटच्या घरी चक्क पिण्याच्या पाण्याने त्याच्या गाड्या धुतल्या जात आहेत. शेजाऱ्यांनी याबाबत तक्रार केली, त्यानंतर नगर निगमकडून कारवाई करत पिण्याचा पाण्याचा अपव्यय केल्याकारणाने 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विराट गुरुग्रामच्या (Gurugram) डीएलएफ फेज-1 मध्ये राहतो. त्याच्या घरी सात गाड्या आहेत. झालेल्या प्रकाराबद्दल माहिती देताना शेजारी सुनील भाटिया यांनी सांगितले, ‘विराटच्या घरी 2 एसयूव्हीसह सात गाड्या आहेत. रोज या गाड्या पिण्याच्या पाण्याने पाईप लावून धुतल्या जातात. यामध्ये शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. याआधी अनेकवेळा असे करण्यापासून त्यांना अडवण्यात आले होते, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.’ डीएलएफ परिसरात पाणी पुरवठा शुल्क म्हणून जवळजवळ 1 रुपये प्रति यार्ड दर आकाराला जातो. जर एखाद्याचे घर 500 यार्डाचे असेल तर प्रति महिना 500 रुपये दर भरावा लागतो. (हेही वाचा: एनर्जी ड्रिंकची जाहिरात करुन फसला विराट कोहली, नेटकऱ्यांनी सुनावले)
डीएलएफ फेज 3 मध्ये गेल्या आठवड्यापासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. देशात अनेक ठिकाणी लोकांना प्यायला पाणी नाही, मात्र विराटच्या घरी गाडी धुण्यासाठी शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया घालवले जात आहे. मूळ दिल्लीचा असलेल्या विराटने गुरूग्राममध्ये, 10 हजार स्केवर फुटचे हे घर 80 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.