2019हार्दिक पांड्या, शुभमन गिल (Photo Credit:Getty)

भारतात किंवा कोणत्याही देशात क्रिकेटचे सामने खेळले जात असोत, खेळाडूंमध्ये होणारं स्लेजिंग हा आता अविभाज्य भाग बनला आहे. गोलंदाज-फलंदाज अनेकदा समोरच्या खेळाडूची लय बिघडवण्यासाठी त्याला शाब्दिक टोमणे मारत सतावत असतात. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्लेजिंग सामान्य आहे. भारतीय खेळाडूही अनेकदा स्लेजिंग करताना आढळले आहेत. टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) KKR च्या सोशल मीडिया पेजवर बोलत असताना एकदा रणजी क्रिकेट खेळत असताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपल्याला स्लेजिंग केल्याचा किस्सा सांगितला. शुभमन हा सध्या असलेल्या सर्वात हुशार तरुण क्रिकेटपटूंपैकी एक आहे. गिलने अंडर-19 वर्ल्डकप 2018 मध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात बॅटने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर त्याला आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर  भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. शुभमनने न्यूझीलंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केले. (IND vs AUS 2020: राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाला दिली चेतावणी; विराट कोहलीविरोधात चुकूनही करू नका अशा प्रकारचे काम, वाचा सविस्तर)

हार्दिकसोबतच्या स्लेजिंगचा किस्सा सांगताना शुभमन म्हणाला, “मी रणजी ट्रॉफी खेळत असताना आमचा सामना बरोडा विरुद्ध होता. मला आठवतंय की हार्दिक मला गोलंदाजी करत होता. तो वारंवार मला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या गोलंदाजीवर एक-दोन फटके खेळण्याचा प्रयत्न केला पण बॉल फिल्डरकडे गेला. यावेळी त्याने मला, हे U-19 क्रिकेट नाहीये, मार ना…मार ना असं बोलून स्लेजिंग केलं. तो असं का करत होता मला खरंच कळत नव्हतं.”

दरम्यान, U-19 क्रिकेटमध्ये आपलं नाव मोठं केल्यानंतर शुभमन अजुनही भारतीय संघात आपलं स्थान पक्कं करण्यासाठी धडपडत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मागील वर्षी आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या शुभमन अजून उठावदार कामगिरी करण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत आहे. वनडेनंतर शुभमनला आता भारताच्या टेस्ट आणि टी-20 टीममध्ये स्थान मिळण्याच्या अपेक्षेत आहे.