Photo Credit- X

New Zealand vs South Africa Head to Head: महिला टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत (ICC Women's T20 World Cup) 18 दिवसांच्या तीव्र स्पर्धेनंतर नवा विजेता मिळणार आहे. 20 ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात अंतिम फेरीचा सामना पार पडणार आहे. महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका(NZ vs SA Final Match) यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांना पहिलं जेतेपद मिळवण्याची संधी आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. तर दक्षिण अफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजून अंतिम सामन्याची पायरी चढली आहे. महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या आतापर्यंत आठ पर्वात हे दोन्ही 16 वेळा आमनेसामने आले आहेत. यात न्यूझीलंडचं पारडं जड असल्याचं दिसून आलं आहे.न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 11 वेळा पराभवाची धूळ चारली आहे. तर दक्षिण अफ्रिकेने 4 वेळा विजय मिळवला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये या दोन्ही संघातील एक सामना निकालाविना संपला. महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिका संघ न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करून दोनदा, तर धावांचा पाठलाग करून 2 वेळा जिंकला आहे. तर न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना 5 वेळा, तर धावांचा पाठलाग करताना 6 वेळा जिंकला आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर न्यूझीलंडचं पारडं जड आहे.

दोन्ही संघांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

दक्षिण अफ्रिकेने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला 10 विकेट आणि 13 चेंडू राखून पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून 7 विकेटने पराभव झाला. तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने स्कॉटलंडचा 80 धावांनी धुव्वा उडवला. चौथ्या सामन्यात बांगलादेशला 7 विकेट राखून पराभूत केलं. तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट आणि 16 चेंडू राखून पराभव केला. (

Happy Birthday Virender Sehwag: वीरेंद्र सेहवागचा 46 वा वाढदिवस; बीसीसीआयसह आयपीएल फ्रँचायझींकडून शुभेच्छाचा वर्षाव)

न्यूझीलंडने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारताचा 58 धावांनी पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून 60 धावांनी पराभूत व्हावं लागलं. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड 8 विकेट राखून, तर चौथ्या सामन्यात पाकिस्तानला 54 धावांनी पराभूत केलं. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर फक्त 8 धावांनी विजय मिळवला.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण आफ्रिका महिला संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिझान कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने , सेश्नी नायडू, मायके दी रिडर

न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड, जेस केर, हॅना रोवे, लेह कॅस्परेक.