Women’s T20 Challenge 2022: IPL 2022 च्या फायनलपूर्वी पुण्यात महिला T20 चॅलेंज (Women's T20 Challenge) स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. पुण्यात या महिन्यात खेळल्या जाणाऱ्या महिला चॅलेंजमध्ये इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट (Heather Knight), नंबर वन गोलंदाज Sophie Ecclestone, ऑस्ट्रेलियाची अलाना किंग (Alana King) यांच्यासह एकूण 12 विदेशी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील एलना ही ऑस्ट्रेलियाची एकमेव क्रिकेटपटू आहे जी 3 संघांमधील 4 सामन्यांच्या या प्रदर्शनीय स्पर्धेचा भाग आहे. नाइट आणि एक्लेस्टोन व्यतिरिक्त इंग्लंडची सोफिया डंकली आणि डॅनी व्याट हे देखील या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे स्टार सलामीवीर लोरा वोलवॉर्ट, मारिजान कॅप आणि वेस्ट इंडिजचे डिआंड्रा डॉटिन व हेली मॅथ्यूज हे देखील सहभागी होणार आहेत. (Women's IPL वर सौरव गांगुलीची मोठी घोषणा, BCCI 2023 मध्ये सुरू करणार संपूर्ण महिला आयपीएल; पाहा काय म्हणाले)
यापूर्वी, बीसीसीआयने तीन संघांमधील ही स्पर्धा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 23 ते 28 मे दरम्यान होणार असल्याचे जाहीर केले होते. कोविड-19 महामारीच्या अडचणींमुळे मागील आवृत्ती होऊ न शकल्यानंतर टी-20 लीग पुनरागमन करणार आहे. बीसीसीआय पुढील वर्षीपासून संपूर्ण महिला आयपीएलचे नियोजन करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, हीदर नाइट आणि अलाना किंग यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची पुष्टी केली आहे. गेल्या महिन्यात विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडचे नेतृत्व करणारी नाइट सध्या फेअरब्रेक आमंत्रण टी-20 स्पर्धेसाठी यूएईमध्ये आहे. महिला टी-20 चॅलेंजमध्ये सहभागी होणारे इतर खेळाडूही तिथे आहेत.
दुसरीकडे, या स्पर्धेसाठीही भारतीय खेळाडूंची लवकरच निवड करण्यात येणार असून त्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या देशांतर्गत टी-20 स्पर्धेतील कामगिरी नक्कीच विचारात घेतली जाईल. 2020 मध्ये झालेल्या महिला टी20 चॅलेंजचे शेवटचे विजेतेपद स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील ट्रॅव्हलब्लेझर्सने हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हासचा पराभव करून जिंकले होते. भारताची देशांतर्गत टी-20 स्पर्धा, वरिष्ठ महिला T20 ट्रॉफी, नुकतीच अंतिम फेरीत महाराष्ट्राचा सात गडी राखून पराभव करून रेल्वे संघ चॅम्पियन बनला. केपी नवगिरे 525 धावा करत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली तर आरती एस केदार, सुजाता मलिक आणि प्रियंका प्रियदर्शनी यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या.