Rohit, Gambhir And Agarkar (Photo Credit - X)

कोलंबो: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (IND vs SL ODI Series 2024) शुक्रवार, 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. याच उत्साहाने भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) उद्यापासून एकदिवसीय सामन्यांमध्येही श्रीलंकेला पराभूत करण्याच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. मात्र, टी-20 खेळलेले अनेक खेळाडू एकदिवसीय सामन्यांमध्ये दिसणार नाहीत. टी-20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रथमच हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. या दरम्यान, रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी देणार आहे हे महत्वाचे असणार आहे.

कर्णधार रोहितसोबत शुभमन गिल सलामीला येणार

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात उपकर्णधार शुभमन गिल कर्णधार रोहित शर्मासह सलामी करताना दिसेल अशी दाट शक्यता क्रिकेट समीक्षक व्यक्त करत आहेत. संघाकडे विराट कोहलीचा पर्याय खुला असला तरी तो सलामीला येण्याची शक्यता कमी आहे. (हे देखील वाचा: IND vs SL ODI Head to Head: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी खेळवला जाणार पहिला वनडे सामना, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड)

श्रेयस, राहुल आणि विराट मधली फळी मजबूत करतील

श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला ताकद देण्यासाठी विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत मधल्या फळीत फलंदाजीसाठी आहेत. हे चारही फलंदाज संघाच्या मधल्या फळीत समतोल राखण्यास सक्षम आहेत. या मालिकेत रियान परागला वनडे पदार्पण करण्याची संधी क्वचितच मिळेल.

अष्टपैलू अक्षर आणि वॉशिंग्टन संघाला समतोल साधतील

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाकडे चार प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत. यामध्ये अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि रियान पराग यांचा समावेश आहे. चारही अष्टपैलू खेळाडू संघाला फलंदाजीत खालच्या क्रमाने ताकद पुरवतील. पण इथेही परागच्या पदार्पणाची शक्यता नगण्य आहे.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराहची उणीव भासणार 

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासणार आहे. मोहम्मद शमीचाही दुखापतीमुळे या मालिकेत समावेश नाही. या दोघांच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराजच्या खांद्यावर तर फिरकीची जबाबदारी कुलदीप यादवच्या खांद्यावर असेल. त्यांना पाठिंबा देण्यासाठी संघात अर्शदीप सिंग, हर्षित राणा, खलील अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रियान पराग असे अष्टपैलू खेळाडू आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.