आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मधील भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) प्रवास संपुष्टात आला आहे. या विश्वचषकात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता पण संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. यासोबतच भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा प्रवावा वरही ब्रेक लागला आहे आणि कोहलीचा टी-20 कर्णधार म्हणूनही प्रवास संपला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या विश्वचषकानंतर पद सोडणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. तर कोहलीने या विश्वचषक स्पर्धेनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे (Team India) कर्णधारपद सोडणार असल्याचे घोषित केले होते. विराट-शास्त्रीच्या जोडीने अनेक यश संपादन करून भारतीय क्रिकेटला नव्या शिखरावर नेले आहे. या दोघांच्या नावावर अनेक यशांचीही नोंद झाली असली तरी त्या अपयशांना देखील दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. रवी शास्त्री 2017 मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक बनले आणि तेव्हापासून विराट कोहलीसोबत संघ चालवत होते, परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या या जोडीला साध्य करता आल्या नाहीत. (T20 World Cup 2021: रवी शास्त्रींच्या ‘या’ मतांचे पाकिस्तान कर्णधार Babar Azam कडून समर्थन, म्हणाला- 'हे खरोखर सोपे नाही’)
आयसीसी स्पर्धा हरली
विराट-शास्त्री जोडीला आयसीसी स्पर्धेचे एकही विजेतेपद जिंकता आले नाही आणि हे त्यांचे सर्वात मोठे अपयश ठरले. संघाला यासाठी अनेक संधी मिळाल्या मात्र संघाला त्याचा फायदा करून घेता आला नाही. 2019 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत न्यूझीलंडकडून, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाला आणि यावेळी टी-20 विश्वचषक स्पर्धेत रिकाम्या हाताने परतला.
न्यूझीलंडमध्ये अयशस्वी
शास्त्री-कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करून दोनदा कसोटी मालिका जिंकली. आणि इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामनेही जिंकले, पण ही जोडी दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकली नाही. यानंतर कोहली आणि शास्त्री ही जोडीही न्यूझीलंडमध्ये अपयशी ठरली. न्यूझीलंडमध्ये झालेल्या कसोटी आणि वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली पण दोन्ही मालिका गमावल्या. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही किवी संघाने भारताचा 3-0 असा सफाया केला.
सर्वात कमी धावसंख्येवर भारताचा डाव आटोपला
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून इतिहास रचला पण कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याचा लज्जास्पद विक्रम आपल्या नावे केला. 2021-22 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या अॅडिलेड कसोटीत टीम इंडियाला अवघ्या 36 धावांवर ऑस्ट्रेलियाने तंबूत धाडले होते.
वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला
वनडे आणि टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने यापूर्वी नेहमीच पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले होते. परंतु यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांना फक्त पराभवच नव्हे तर 10 गडी राखून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.