पृथ्वी शॉ (Photo Credit: PTI)

Vijay Hazare Trophy 2021: भारत आणि मुंबई फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने लिस्ट A क्रिकेटमधील 200 धावांच्या क्लबमध्ये प्रवेश करून इतिहास रचला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) मुंबईकडून (Mumbai) डावाची सुरुवात करताना शॉने 45व्या ओव्हरमध्ये एक धाव घेत आपले पहिले द्विशतक पूर्ण केले. या खेळीच्या अगोदर न्यूझीलंड ए विरुद्ध भारत अ संघासाठी सर्वाधिक 150 धावा केल्या होत्या. पृथ्वीच्या लिस्ट A क्रिकेटमधील हे सहावे शतक ठरले. शिवाय, लिस्ट ए क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा तो 8वा भारतीय फलंदाज ठरला आहे. याची सुरुवात सर्वप्रथम महान फलंदाज सचिन तेंडुलकरने केली. सचिननंतर वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, शिखर धवन आणि कर्ण कौशल यांनी त्याचे अनुसरण केले. शॉ हा मुंबईचा हा पराक्रम गाठणारा दुसरा क्रिकेटर आहे. 2019/20 ध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध यशस्वी जयस्वालने 203 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. (On This Day in 2010: सचिन तेंडुलकर यांनी आजच्या दिवशी रचला होता विक्रम; एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा ठरला होता पहिला खेळाडू)

विशेष म्हणजे, पृथ्वी कर्णधार म्हणून विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला, तर स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा रेकॉर्डही त्याच्या नावावर झाला आहे. पृथ्वीने 227 धावा केल्या तर त्यापूर्वी संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 212 धावा केल्या होत्या. कारकीर्दीत पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करत शॉने केवळ 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर, 20वी ओव्हर पूर्ण होण्यापूर्वीच तीन आकडी धावसंख्या गाठली आणि त्यानंतर 150 धावांचा टप्पा गाठला. मुंबईने 50 ओव्हरमध्ये 457 धावसंख्या गाठली ज्यात पृथ्वीने 152 चेंडूत 227 नाबाद धावांचे योगदान दिले. शिवाय, शॉच्या नाबाद 227 धावा विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. येत्या काही दिवसात टी-20 संघासह इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवलेल्या सूर्यकुमार यादवनेदेखील चमक दाखवली आणि 58 चेंडूत 229.31च्या सरासरीने 133 धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचा ओपनर म्हणून पहिली निवड असलेल्या पृथ्वीला सलामीच्या कसोटी सामन्यानंतर प्ले इलेव्हनमधून वगळण्यात आले. आयपीएलमधील खराब खेळीमुळे उजव्या हाताच्या फलंदाजाने यापूर्वीच वनडे संघातील देखील आपले स्थान गमावले होते. पृथ्वीचे लक्ष आता राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यावर असून त्याचा अलीकडचा फॉर्म त्याला इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी एकदिवसीय संघात पुनरागमन मिळवून देईल. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 105 नाबाद, 34 आणि 227 नाबाद अशा धावा केल्या आहेत. तर, श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत तो मुंबईचे नेतृत्व देखील करीत आहे.