क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC Final 2023) सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक धन्सू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआय (BCCI) भारतीय संघाची घोषणा कधी करणार याची सर्व क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतासाठी सलामी देताना दिसू शकतात. कसोटी क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंचा फॉर्म अप्रतिम आहे. गिलने गेल्या 2 महिन्यात सर्व फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. त्याचवेळी रोहितने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धही कसोटी शतक झळकावले. याशिवाय भारतीय कसोटी संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अजिंक्य रहाणेला संघात मिळू शकते स्थान
पुढे बोलायचे झाले तर अनुभवी फलंदाज विराट कोहली संघात चौथ्या क्रमांकावर उतरेल. त्याचवेळी निवड समितीसमोर श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत पाचव्या क्रमांकाचे स्थान भरण्याचे आव्हान होते. सूर्यकुमार यादवला या फॉरमॅटमध्ये यश मिळू शकले नाही. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाल्याची बातमी पुन्हा एकदा समोर येत आहे. त्याचबरोबर केएस भरत यष्टिरक्षक म्हणून खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
अश्विन-जडेजा यांचा असेल समावेश
तसे, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यापैकी एक खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. इंग्लिश खेळपट्ट्यांवर संघ दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरत नाहीत. पण हे दोन्ही खेळाडू संघात सामील होणार हे नक्की. त्याचबरोबर केएल राहुलचाही संघात समावेश होऊ शकतो. याशिवाय मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांना संघातील वेगवान गोलंदाजांच्या फळीत स्थान दिले जाऊ शकते. (हे देखील वाचा: WTC Final 2023: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, 'हे' धोकादायक खेळाडू भारताविरुद्ध उतरणार मैदानात)
WTC फायनलसाठी भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, केएस भरत, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट.